प्रार्थना बेहरे (Prarthana Behere) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांना अपडेट देत असते. नुकतेच तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती, जी पाहून चाहते चिंतेत पडले होते. तिच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती आणि तिच्या पायाची शस्त्रक्रिया झाली आहे. दरम्यान आता तिला डिस्चार्ज मिळाला असून ती रिकव्हर होत असल्याचे तिने फोटो व व्हिडीओ शेअर करत सांगितलं आहे. तसेच तिने चाहत्यांचे आभारदेखील मानले आहेत.
प्रार्थना बेहरेने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात तिच्यासोबत तिचा नवरा दिसत आहे. तसेच यात तिच्या शस्त्रक्रिया झालेल्या पायाचाही फोटो शेअर केला आहे. सध्या ती वॉकरच्या सहाय्याने चालत आहे. तिने आरशासमोर चालतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, रिकव्हरिंग. तुम्ही दाखवलेल्या प्रेमासाठी खूप आभारी आहे. यात तिने हॅशटॅगमध्ये लिहिले की, आयुष्य सुंदर आहे. गुडघ्याची शस्त्रक्रिया. दररोज बरं वाटतंय आणि तुम्ही दिलेल्या प्रेमासाठी धन्यवाद. प्रार्थनाच्या या पोस्टवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.
प्रार्थनाच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर शेवटची ती प्रसाद खांडेकर दिग्दर्शित 'चिकी चिकी बुबूम बुम' या चित्रपटात पाहायला मिळाली होती. तिच्यासोबत या चित्रपटात प्राजक्ता माळी, स्वप्नील जोशी, वनिता खरात हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. त्यानंतर आता ती तिचा नवरा अभिषेक जावकरने दिग्दर्शित केलेल्या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त नुकताच पार पडला. अद्याप या चित्रपटाचे टायटल फायनल झालेले नाही.