Join us  

Vijay Chavan Death: विजय चव्हाण यांच्या निधनामुळे चांगला मित्र व कलाकार गमावला - प्रदीप पटवर्धन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2018 12:14 PM

Vijay Chavan Death: ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचं दीर्घ आजाराने निधन झालं आहे. मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली.

ठळक मुद्देअसा नट पुन्हा होणे नाही - प्रदीप पटवर्धन

ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण यांचे दीर्घ आजाराने निधन झाले असून त्यांनी मुलुंडच्या फोर्टीस रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विजय चव्हाण यांनी त्यांच्या अभिनयाने गेल्या अनेक वर्षांपासून मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीने एक हरहुन्नरी कलाकार हरपला आहे. 

अभिनेते प्रदीप पटवर्धन व विजय चव्हाण यांनी 'मोरूची मावशी' या नाटकात एकत्र काम केले होते. त्यांनी एक चांगला मित्र, कलाकार व व्यक्ती गमावली असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ''मोरूची मावशी' या नाटकाचे आम्ही दीड हजार प्रयोग एकत्र केले होते. असा माणूस व नट पुन्हा होणे नाही. ते खूप चांगले व्यक्ती होते. कधीच कोणाशी भांडले नाहीत. सगळ्यांशी मिळून मिसळून राहायचे. सगळ्यांना ते सांभाळून घ्यायचे. प्रेमळ स्वभावाचे ते होते. त्यांच्याबद्दल जेवढे बोलेन तितके कमीच आहे. चांगला नट व हरहुन्नरी कलाकार आज हरपला आहे. त्याहीपेक्षा आज चांगला मित्र मी गमावला आहे. त्यांची पोकळी भरून निघणे शक्य नाही व असा माणूस पुन्हा होणे शक्य नाही.'विजय चव्हाण यांचा जन्म लालबागमधला. मध्यमवर्गीय कुटुंबातील विजय चव्हाण लालबागमधील प्रसिद्ध भारतमाता चित्रपटगृहाच्या मागच्या बाजूला असलेल्या हाजी कासम चाळीत लहानाचे मोठे झाले. विजय चव्हाण यांनी त्यांचे महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल या कॉलेजमधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना ते अनेक एकांकिकांमध्ये भाग घेत असत. विजय चव्हाण यांना त्यांची पहिली एकांकिका विजय कदम यांच्यामुळे मिळाली. एकांकिकेमध्ये भाग घेणारा स्पर्धक ऐनवेळी काही कारणास्तव येऊ शकला नव्हता. पण त्या एकांकिकेच्या रंगीत तालमींना विजय चव्हाण नेहमी उपस्थित असायचे. त्यामुळे या एकांकिकेतील सगळे संवाद त्यांना पाठ होते. ही एकांकिका विजय चव्हाण खूप चांगल्याप्रकारे सादर करू शकतील असा विजय कदम यांना विश्वास होता आणि त्यामुळेच त्यांनी विजय चव्हाण यांचे नाव सुचवले.

टॅग्स :विजय चव्हाण