Join us  

'माझ्याकडे तुमच्या कटू आठवणी आहेत कारण..'; वडिलांसाठी फुलवाची भावनिक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2023 4:02 PM

Phulwa khamkar:फुलवा अवघ्या पाचवीमध्ये असताना तिच्या वडिलांचं निधन झालं.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय आणि तितकीच प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका म्हणजे फुलवा खामकर (phulwa khamkar). फुलवाने आजवर अनेक गाजलेल्या सिनेमांसाठी नृत्यदिग्दर्शन केलं आहे. इतकंच नाही तर काही डान्स रिअॅलिटी शोजसाठी तिने परिक्षकाची भूमिकाही बजावली आहे. त्यामुळे ती सातत्याने चर्चेत येत असते. परंतु, यावेळी फुलवा कोणत्याही कोरिओग्राफीमुळे नाही तर तिच्या वडिलांमुळे चर्चेत आली आहे. फुलवाने तिच्या वडिलांसाठी एक भावूक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

फुलवा ही प्रसिद्ध लेखक अनिल बर्वे यांची लेक आणि राही बर्वेची बहीण आहे. त्यामुळे फुलवाला कुटुंबाकडूनच कलेचा वारसा मिळाला आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या फुलवाने अलिकडेच तिच्या वडिलांसाठी एक पोस्ट शेअर केली. फुलवाचे वडील, अनिल बर्वे यांचं निधन झालं त्यावेळी ती फार लहान होती. त्यामुळे कमी वयात वडील गमावल्याचं दु:ख तिने या पोस्टमधून व्यक्त केलं आहे.

काय आहे फुलवाची पोस्ट?

"बाबा…. आज तुम्हाला जाऊन ३९ वर्ष झाली.मी पाचवीमधे होते. सकाळपासून खूप धडधडत होतं. आई हॉस्पिटलमधून आली आणि तिने सांगितलं बाबा गेले. मला फक्त आजोबांचा आक्रोश आठवतोय. आजी आणि आई खूप शांत होत्या! दारूमुळे माणूस इतका असहाय्य होऊ शकतो? एक अत्यंत प्रतिभावान, हुशार आणि जगाच्या पुढे असणारा माणूस दारूमुळे वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी जातो हे भयानक आहे! मग बाबा हा कप्पा मी पूर्णपणे बंद करुन ठेवला! मात्र तुमच्या लिखाणामुळे आजच्या पिढीला सुद्धा लेखक अनिल बर्वे माहीत आहे याचा खूप आनंद आम्हाला होतो. अनिल बर्वेची आम्ही मुलं आहोत हा अभिमान सुद्धा आम्हाला आहे! ज्यूलिएटचे डोळे, रोखलेल्या बंदुका आणि उठलेली जनता, कोलंबस वाट चुकला, अकरा कोटी गॅलन पाणी, थँक यू मिस्टर ग्लाड, हमीदा बाईची कोठी, स्टड फार्म, डोंगर म्हातारा झाला, पुत्र कामेष्टी, मी स्वामी या देहाचा, आकाश पेलताना. किती किती वेगळं आणि काळाच्या पुढचं लिखाण होतं तुमचं बाबा !! तुमच्या उमेदीच्या काळात तुम्ही केलेल्या अनेक गोष्टींपैकी एक म्हणजे तुम्ही चालवलेलं एक फिल्मी मासिक,ज्याचं नाव होतं फुलवा, नेहमीप्रमाणेते सगळं व्यवस्थित बुडलं, कुण्या एका मित्राने तुम्हाला सांगितलं की फुलवा हे नाव लाभदायक नव्हे. झालं भविष्य, देव, धर्म यावर विश्वास नसलेल्या तुम्हाला याचा राग आला आणि तुम्ही म्हणालात मला जर मुलगी झाली तर तिचं नाव मी फुलावाच ठेवणार ,ती नाव काढेल! हा किस्सा मला हल्लीच समजला आणि आम्ही खूप हसलो. आणीबाणीच्या काळात तुमच्यावर नजर ठेवणाऱ्या गुप्त पोलिसाला त्याला उगाच त्रास नको म्हणून तुम्ही बरोबरच घेऊन फिरत होता," असं फुलवाने म्हटलं.

पुढे ती म्हणते, "बाबा तुम्ही सामान्य माणूस या कक्षेत बसणारे नव्हता. पण एक मुलगी म्हणून मात्र माझ्याकडे तुमच्या खूप वेगळ्या आणि काहीशा कटू आठवणी आहेत कारण मला आठवणारे बाबा दारूच्या खूप आहारी गेले होते. इतक्या गोड माणसाला ती दारू संपवीत होती. आम्ही खूप लहान होतो! मी ९ वर्षांची, राही ४ आणि आमच्या हातात काहीच नव्हत! असहाय्य होतो आम्ही… बाबा, इतकी वर्ष तुमच्या बद्दल मनात एक किंतू होता पण आता तो नाहीये! कदाचित आता तुमच्याकडे एक माणूस म्हणूनसुद्धा मी पाहू शकतेय इतका समजूतदारपणा वयामुळे माझ्यात आला असावा.आज मला खरच खूप वाटतय की तुमच्या दोन्ही मुलांचं पुढे काय झालं हे पहायला तुम्ही हवे होतात. आज तुमच्या मुलीचं नाव फुलवा ठेवल्याचा तुम्हाला आनंद झाला असता आणि राहीला पाहून,त्याचं काम पाहून त्याला डोक्यावर घेऊन तुम्ही नाचला असतात. तुमच्या लिखाणाचा वारसा त्याने घेतला आहे. आज तुम्हाला आमचा अभिमान वाटावा अस काम करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय बाबा ! तुमची फुलवा

टॅग्स :फुलवा खामकरसिनेमासेलिब्रिटीटेलिव्हिजन