पंढरपुरात अवतरले प्रति पंढरपूर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2017 15:07 IST
महाराष्ट्राचे वैभव असलेली पंढरीच्या वारीची परंपरा म्हणजे अखंडत्वाने चालत आलेला एकमेवाद्वितीय असा अभूतपूर्व सोहळा. यावेळी पंढरपुराला 'भूवैकुंठ' का म्हणतात ...
पंढरपुरात अवतरले प्रति पंढरपूर!
महाराष्ट्राचे वैभव असलेली पंढरीच्या वारीची परंपरा म्हणजे अखंडत्वाने चालत आलेला एकमेवाद्वितीय असा अभूतपूर्व सोहळा. यावेळी पंढरपुराला 'भूवैकुंठ' का म्हणतात याचा प्रत्यक्ष अनुभव येतो. चैत्र वारी असो, आषाढी, कार्तिकी वारी असो अथवा माघी वारी शतकानुशतके ही अलंकापुरी तिच्या लेकरांनी भारावलेलीच असते. अशा ह्या वारीच्या वातावरणात एखाद्या चित्रपटाचे शूट करणे म्हणजे खरंच तारेवरची कसरत असते. तेथे एखाद-दोन भक्तांचा प्रश्न नसून संपूर्ण पंढरी नादावलेली असते. तेव्हा “गोरिला शूट”च्या साहाय्याने आपल्याला हवे असलेले मोंताज मिळविणे, आजूबाजूच्या गर्दीचा आवाज न येऊ देता अभिनेत्याचे संवाद स्पष्ट ऐकू येणे, आपल्यामुळे इतर कोणालाही त्रास न होऊ देणे त्याचप्रमाणे कलाकार मंडळी, युनिट ह्यांना देखील कसला त्रास होऊ नये एवढया सर्व गोष्टींची काळजी घेण्याची जबाबदारी कॅप्टन ऑफ द शिप म्हणजेच त्या चित्रपटाच्या दिग्दर्शकावर असते. ही जबाबदारी म्हणजे जणू काही शिव धनुष्य हाती घेण्यासारखंच आहे. विधि कासलीवाल यांच्या लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत आणि माय रोल मोशन पिक्चर्स निर्मित 'रिंगण' चित्रपटाचे लेखक व दिग्दर्शक मकरंद माने यांनी हे शिव धनुष्य फक्त हातीच नाही घेतले तर ते यशस्वीरित्या पेललेदेखील आणि त्यातून सोडलेल्या बाणाने थेट नॅशनल फिल्म अवार्डच मिळवून दाखवला. २००७-२०१२ या पंचवार्षिक योजनेच्या अथक प्रयत्नांनंतर रिंगणात अडकलेल्या बाप-लेकाला त्यातून सोडवून, आत्मविश्वासाने ते तोडण्यात यशस्वी झालेले आहेत. 'रिंगण' चित्रपटाच्या चित्रीकरणाचा सत्तर टक्के भाग हा “गोरिला शूट” च्या साहाय्याने चित्रित केला गेला आहे. व्यक्तीला जीवनात आलेले अनुभव आणि त्याची तत्परता याचा कधी कुठे कसा फायदा होईल हे खरंच सांगता येत नाही. 'रिंगणाच्या चित्रीकरणाच्या वेळी देखील मकरंदजींच्या पाठी असलेले त्यांचे अनुभव आणि तत्परतेमुळे त्यांनी ऐन पंढरपुरात माघी वारीत दोन ठिकाणी चित्रीकरणाचा घाट घातला होता. एक जिथे छुप्या कॅमेऱ्यातून खरा-खुरा चित्रपट शूट होतोय हे कोणाला माहितीही नव्हतं अशा ठिकाणी तर दुसरा म्हणजे पथनाट्याच्या डमी चित्रीकरणाचा घाट. वारीची बरीचशी गर्दी पथनाट्याकडे वळल्यामुळे खऱ्याखुऱ्या शूटच्या वेळी जास्त गर्दी नसल्याकारणास्तव आणि जनसामान्यांच्या कॅमेऱ्याकडे, कालाकारांकडे आतुरतेने खिळलेल्या नजरांपेक्षा वास्तविकता भासविणारा चित्रपट आपल्या हृदयाला स्पर्श करून जातो. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ म्हणतात त्याचा अगदी तंतोतंत परिचय आपल्याला 'रिंगण' चित्रपटाद्वारे बघायला मिळतो. युक्ती, मेहनत आणि प्रयत्न यांनी आपण आपल्या भोवतीचे प्रत्येक रिंगण सोडवू शकतो मात्र प्रगाढ आत्मविश्वास असेल तर आपण ते तोडूही शकतो. सुटता सुटत नसलेले परंतु प्रयत्नांनी सुटणारे आणि आत्मविश्वासाने तुटणारे दिग्दर्शक मकरंद माने दिग्दर्शित हे 'रिंगण' संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाले आहे.