पल्लवी जोशी (Pallavi Joshi) अनेक वर्ष इंडस्ट्रीत आहे. 'द काश्मीर फाईल्स' गाजवल्यानंतर आता ती 'द बंगाल फाईल्स' मधून भेटीला येणार आहे. त्यापूर्वी ती 'तन्वी द ग्रेट' सिनेमात दिसली ज्याचं नुकतंच कान्स फिल्म फेस्टिव्हलध्ये प्रीमियर पार पडलं. पल्लवी मराठी इंडस्ट्रीतही तितकीच सक्रीय होती. सारेगमप या संगीत रिएलिटी शोचं तिने सूत्रसंचालन केलं. 'ग्रहण' या मालिकेतही ती झळकली. मात्र पुन्हा मराठीत का दिसली नाहीस? असा प्रश्न तिला विचारण्यात आला. यावर तिने उत्तर दिलं आहे.
पल्लवी जोशी मराठीतलं सर्वांच्या परिचयाचं नाव आहे. मात्र सध्या ती हिंदी इंडस्ट्रीतच जास्त रमली आहे असंच अनेकांना वाटतंय. याच संदर्भात 'महाराष्ट्र टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत पल्लवी जोशी म्हणाली, "मराठी इंडस्ट्री मला बोलवतच नाही. मी हिंदीतच असते अशीच त्यांची समजूत झाली आहे. मी मराठी सिनेमे आवर्जुन बघत असते. ही भूमिका मी चांगली करु शकले असते असंही मला अनेकदा वाटतं. मला मराठीत काम करायला आवडतंच."
ती पुढे म्हणाली, "हिंदीत मी आणि माझा नवरा विवेक एकत्र काम करतो. पण म्हणून आम्ही स्वतंत्र काम करत नाही असं मुळीच नाही. त्यालाही स्वतंत्र कामाची विचारणा होत असते. हा फक्त बायकोसोबतच काम करतो असा त्याच्याबाबतीत कोणी समज करु घेतलेला नाही. पण माझ्याबाबतीतच तो करुन घेतला आहे. मी एक निर्मातीसुद्धा आहे हे सगळे सोयीस्कररित्या विसरतात. मी फक्त नवऱ्यासोबतच काम करते असं नाहीए."
पल्लवी जोशीने मराठी, हिंदी, गुजराती आणि दाक्षिणात्य सिनेमांमध्येही काम केलं आहे. 'असंभव', 'ग्रहण', 'अल्पविराम' अशा मराठी मालिका केल्या आहेत. 'द काश्मीर फाईल्स', 'द ताश्कंत फाईल्स' साठी तिला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे.