Join us
Daily Top 2Weekly Top 5

आता हा पार्श्वगायकही लवकरच अभिनेता म्हणून सिनेमात झळकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 10:33 IST

सध्या सिनेमात एकच व्यक्ती विविध गोष्टी करत असल्याचं पाहायला मिळतं. एखादा अभिनेता गायक म्हणूनही स्वतःची छाप पाडतो, एखाद्या अभिनेत्रीचेही ...

सध्या सिनेमात एकच व्यक्ती विविध गोष्टी करत असल्याचं पाहायला मिळतं. एखादा अभिनेता गायक म्हणूनही स्वतःची छाप पाडतो, एखाद्या अभिनेत्रीचेही सूर तितकेच पक्के असतात, दिग्दर्शक हा अभिनेता म्हणूनही झळकतो तर पार्श्वगायकही अभिनय करताना पाहायला मिळतो. दिवसेंदिवस सिनेमात अशा मल्टिटास्किंग कलावंत व्यक्ती वाढत असल्याचे दिसून येत आहे. आता हेच पाहा ना सलमान खान, आमीर खान, शाहरुख, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर, श्रुती हसन यांनी त्यांच्या सिनेमात अभिनय करता करता सूरांची जादूही दाखवून दिली आहे. अभिनेता पार्श्वगायक बनत आहेत हे पाहून गायकही कसे मागे राहतील. ब्रेथलेस गाण्याने सा-यांची मनं जिंकणारे प्रसिद्ध पार्श्वगायक आणि संगीत दिग्दर्शक शंकर महादेवन यांनीही हम भी कम नहीं म्हणत अभिनयाच्या क्षेत्रात पाऊल ठेवलं. कट्यार काळजात घुसली या गाजलेल्या मराठी सिनेमात ते अभिनेता म्हणून रुपेरी पडद्यावर झळकले. आता याच 'कट्यार काळजात घुसली' सिनेमाशी संबंधित आणखी एक व्यक्ती मराठी सिनेमात काम करण्याची शक्यता आहे. या सिनेमातून प्रसिद्ध शास्त्रीय गायक महेश काळेनं पार्श्वगायक म्हणून प्रचंड लोकप्रियता मिळवली. याच सिनेमातील गायनासाठी त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही गौरवण्यात आलं. मात्र आता महेश काळे लवकरच रुपेरी पडद्यावर अभिनेता म्हणून झळकण्याची शक्यता आहे. कट्यारच्या यशानंतर गायक म्हणून महेशनं मराठी चित्रपटसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यामुळे विविध संगीत रिअॅलिटी शोमध्येही परीक्षकाच्या भूमिकेतही तो झळकला आहे. आता मराठी सिनेमात तो अभिनय करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एखादी चांगली स्क्रीप्ट मिळाल्यास सिनेमात काम करायला आवडेल असं सांगत खुद्द महेश काळेने याचे संकेत दिले आहेत. काही ऑफर्सही आल्याचे त्याने सांगितले आहे. तसं पाहायला गेले तर अभिनय महेश काळेसाठी नवीन नाही.अभिनयाचं बाळकडू त्याला घरातूनच मिळालं आहे.वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेली कट्यार काळजात घुसली या संगीत नाटकातील खाँ साहेबांची व्यक्तीरेखा महेश काळेने साकारली आहे.त्यामुळे अभिनयाचे क्षेत्र त्याच्यासाठी काही वेगळे नाही. आता संगीत रंगभूमीवर छाप पाडणा-या या अभिनेत्यानं मराठी सिनेमातही अभिनेता म्हणून झळकावं अशीच त्याच्या फॅन्सची इच्छा असेल.