अभिनेत्री निवेदिता सराफ या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. निवेदिता यांनी आपल्या कारकीर्दीत विविध सिनेमा, मालिका, नाटकांमध्ये काम करुन प्रेक्षकांचं मन जिंकलंय. निवेदिता यांची भूमिका असलेला 'बिन लग्नाची गोष्ट' हा सिनेमा नुकताच रिलीज झालाय. या सिनेमात निवेदिता यांनी साकारलेल्या भूमिकेचं चांगलंच कौतुक होतंय. अशातच एकाच दिवशी 'बिन लग्नाची गोष्ट'सोबतच 'दशावतार', 'आरपार' हे दोन मराठी सिनेमे रिलीज झाले आहेत. तिन्ही मराठी सिनेमे चांगले असून त्यात लोकप्रिय कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. दरम्यान एकाच दिवशी अनेक सिनेमे रिलीज होणं, बरोबर की चूक याविषयी निवेदिता सराफ यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय.
एकाच दिवशी अनेक सिनेमे रिलीज होतात, तर...नवशक्तीला दिलेल्या मुलाखतीत निवेदिता सराफ यांनी मनातील भावना स्पष्टपणे सांगितल्या. त्या म्हणाल्या की, ''आता आपण एकाच दिवशी ८ - ९ मराठी सिनेमे रिलीज होताना बघतोय. प्रिया (प्रिया बापट) म्हणाली होती की, रविवारी पुण्यात नाटकाचे सहा प्रयोग होते. सहाही प्रयोग हाउसफुल्ल. लोक नाटकासाठी बाहेर पडत आहेत, त्यामुळे सिनेमासाठीही त्यांनी बाहेर पडावं. त्यामुळेच एकाच दिवशी एवढे सिनेमे रिलीज होणं मला वैयक्तिकरित्या चुकीचं वाटतं. ऑलरेडी सध्या पिक्चर चालत नाहीयेत. त्यामुळे तुम्ही पर्सनली एकमेकांशी बोललं पाहिजे. आपण निर्माते म्हणून एकत्र नाही आहोत. जे एकत्र येऊन करण्याची गरज आहे.''