बालपणाला नव्याने उजाळा देणारा ‘फिरकी’ ९ मार्चला रसिकांच्या भेटीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2018 11:02 IST
मनोरंजनाची चौकट न मोडता अधिक आशयपूर्ण आणि प्रत्यक्ष जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट देण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत.स्पॅाटलाईट ...
बालपणाला नव्याने उजाळा देणारा ‘फिरकी’ ९ मार्चला रसिकांच्या भेटीला
मनोरंजनाची चौकट न मोडता अधिक आशयपूर्ण आणि प्रत्यक्ष जीवनाशी जवळीक साधणारे चित्रपट देण्याचा प्रयत्न करणारे चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताहेत.स्पॅाटलाईट प्रोडक्शनच्या ‘फिरकी’ या आगामी मराठी चित्रपटातून ‘पतंगा’ च्या चित्रचौकटीतून लहानग्याच्या भावविश्वाचा आणि त्याच्या आयुष्याचा प्रवास सुरेखरीत्या उलगडण्यात आला आहे. येत्या ९ मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मौलिक देसाई यांनी या चित्रपटाची निर्मिती केली असून लेखन व दिग्दर्शन सुनिकेत गांधी यांचे आहे.फिरकीच्या मदतीने पतंगाचा प्रवास कधी उंच भरारीचा तर कधी हेलकावण्याचा असतो. आयुष्याचे ही असेच असते.प्रत्येकालाच आयुष्यात काही ठोस असे ईप्सित साध्य करायचे असते त्यात अनेक अडथळे येतात, त्यावर मात करून पुढे जायचे असते. या चित्रपटातही हा संघर्ष आहे. या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असलेल्या गोविंदला (पार्थ भालेराव) व त्यांच्या मित्रांना पतंग उडवण्याचा खूप नाद आहे, पण अचानक एका अडचणीत सापडलेला गोविंद कशा मार्ग शोधतो? त्याला त्याच्या मित्रांची कशी साथ मिळते? आणि गोविंद कसा वडिलांच्या मदतीने हा जिंकण्याचा प्रवास अनपेक्षितरित्या गाठतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. लहानपणी पतंग उडवताना झालेली टशन, मस्ती, गंमत आणि मित्रांची साथ या सगळ्यां गोष्टींची आठवण करून देणारा चित्रपट म्हणजे ‘फिरकी’.अनेक राष्ट्रीय व आतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये गौरविण्यात आलेल्या ‘फिरकी’ चित्रपटात पार्थ भालेराव, पुष्कर लोणारकर,अभिषेक भाराटे, अथर्व उपासनी,अथर्व शाळीग्राम या बालकलाकारांसोबत हृषिकेश जोशी, ज्योती सुभाष, अश्विनी गिरी,किशोर चौघुले या कलाकारांच्या चित्रपटात भूमिका आहेत.पटकथा व संवाद सुनिकेत गांधी, आदित्य अलंकार, विशाल काकडे यांनी लिहिले आहेत. छायांकन धवल गणबोटे तर संकलन नितेश राठोड यांचे आहे.अंबरीश देशपांडे, मैउद्दीन जमादार यांच्या लेखणीतून साकारलेल्या वेगवेगळ्या जॉंनरच्या तीन गीतांना भूषण चिटणीस, श्रीरंग धवले, सुनीत जाधव यांनी संगीत दिले आहे. जगण्याची प्रेरणा देणारा आशय, सुंदर कथा, अभिनयाने मोहून टाकणारे निरागस चेहरे आणि त्याला सुश्राव्य संगीताची जोड ह्या सगळ्याचा अविस्मरणीय अनुभव म्हणजे फिरकी. आजवर मराठी चित्रपटांमधून नवनवीन विषय हाताळले गेले आहेत, परंतु पतंग या विषयाला धरून दिग्दर्शक सुनिकेत गांधी आणि निर्माते मौलिक देसाई यांनी केलेला पहिला प्रयत्न नक्कीच तुम्हाला तुमच्या लहानपणीच्या आठवणीत घेऊन जाईल. ९ मार्चला ‘फिरकी’ प्रदर्शित होणार आहे.