Join us

प्रेमाचा नवा पैलू उलगडणारी लव्हस्टोरी 'असेही एकदा व्हावे'

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2018 18:45 IST

विविध नात्यांच्या गुंतागुंतीने भरलेल्या आयुष्यात कधीतरी वाटते, असेही एकदा व्हावे...याच आशेवर आपण आपले आयुष्य जगत असतो. नात्यांच्या या आशावादी ...

विविध नात्यांच्या गुंतागुंतीने भरलेल्या आयुष्यात कधीतरी वाटते, असेही एकदा व्हावे...याच आशेवर आपण आपले आयुष्य जगत असतो. नात्यांच्या या आशावादी पैलूंवर आधारीत चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. झेलू एंटरटेन्मेंट निर्मित आणि सुश्रुत भागवत दिग्दर्शित असेही एकदा व्हावे या चित्रपटाच्या टीमने प्रमोशनच्या निमित्ताने लोकमत ऑफिसला नुकतीच भेट दिली. यावेळी लोकमतशी बोलताना चित्रपट दिग्दर्शक सुश्रुत भागवत म्हणाले, मी आणि शर्वाणी पिल्लई दोघांनी मिळून चित्रपटाची कथा लिहिला आहे. आपण सर्व रेडिओवर आर जेला खूप वेळा ऐकत असतो. आपल्या प्रवासा दरम्यान अशा आर जे च्या प्रेमात जर कोणी पडलं तर त्यांची लव्ह स्टोरी कशी असू शकेल? ते कधी एकमेकांना फार वेळेला भेटू शकणार नाही. पण तरी त्यांच्यातले नातेसंबंध कसे असतील? याचा विचार करून तयार केलेली ही एक प्रेम कथा आहे. अगदी साधी, सरळ, गोड, प्रत्येकाला पाहावीशी वाटणारी ही आर जे व एका श्रोत्याची प्रेमकथा प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस येईल. अभिनेता उमेश कामत म्हणाला, असेही एकदा व्हावे या चित्रपटामध्ये माझी एका श्रोत्याची भूमिका असून, तो एका मसाल्याच्या कंपनीचा मालक असतो. काही गोष्टी आपल्या अशक्य वाटत असतात. पण, जर आपण त्या मिळवण्यासाठी मनापासून त्याची इच्छा व्यक्त केली किंवा प्रयत्न केला तर त्या गोष्टी शक्य होऊ शकतात. माझ्या मते, अशक्य गोष्टी शक्य करण्याची ही एक जर्नी आहे. मी खूप नशीबवान आहे की मराठी इंडस्ट्रीत काम करतो. तो सांगतो, मराठी इंडस्ट्रीमध्ये कलाकाराला फिल्म टेलिव्हीजन आणि थिएटर असे तीनही एकाच वेळेला करायला मिळते. मला तिन्ही माध्यमांमध्ये काम करायला फार आवडते. अभिनेत्री तेजश्री प्रधान म्हणाली, या चित्रपटामध्ये मी आर.जेच्या भूमिकेत झळकरणार असून माझा लुक चाहत्यांना सुखद धक्का देणारा ठरणार आहे. उमेश आणि मी पहिल्यांदाच एकत्र काम करत आहोत. एका स्वावलंबी मुलीची व्यक्तिरेखा साकारत आहे. तिचे आई वडील अत्यंत मोठ्या बिझनेस मध्ये असतात. एका सुखी कुटुंबामध्ये ती राहत असूनदेखील तिला स्वत:साठी काहीतरी करायचे आहे. स्वबळावर, स्वत:च्या मेहनतीने पुढे जायचे आहे. तिने आर जे म्हणून काम करताना खूप अवॉर्डस् मिळवले आहे. बेस्ट फायू आर जे मध्ये ती आलेली आहे. तिचे स्वत:चे काम हसत खेळत करणारी क्यूट किरण तुम्हाला या चित्रपटातून बघायला मिळणार आहे.शर्वाणी पिल्लई म्हणाल्या, या चित्रपटामध्ये मी उमेश च्या बहीणीची भूमिका करत आहे. आमची मसाल्याची कंपनी आहे. आम्ही दोघे भाऊ बहीण  मिळून कंपनी चालवतो. सगळे महत्वाचे निर्णय उमेश घेत असतो. ही आमच्या आई वडीलांनी सुरू केलेली कंपनी आहे. एका अपघातात आई वडील जातात आणि त्यानंतर एक मोठी बहीण म्ह़णून आलेली सर्व जबाबदारी मी पार पाडते. मधुकर रहाणे यांची निर्मिती असलेलया असेही एकदा व्हावे चित्रपटासाठी रविंद्र शिंगणे यांनी ही साथ दिली आहे. सुश्रुत भागवत यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात उमेश कामत आणि तेजश्री प्रधान यांच्या मुख्य भूमिका असून चित्रपटात या दोघांसोबत शर्वाणी पिल्लई, डॉ. निखिल राजेशिर्के, चिराग पाटील, कविता लाड आणि अजित भुरे या कलाकारांच्याही भूमिका आहेत. ‘किती बोलतो आपण’ आणि ‘सावरे रंग मे’ या गाण्यांना अवधूत गुप्तेने संगीतबद्ध केले असून या चित्रपटात एक रोमॅण्टिक गाणं, एक गझल तर एक शास्त्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. त्याचप्रमाणे, उमेश कामत आणि तेजश्री प्रधान यांची 'यु नो व्हॉट' ही कवितादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. अशा प्रकारे दर्जेदार कथानक, दिग्दर्शन आणि अनुभवी अभिनयाने नटलेला, मनोरंजन आणि संगीताची सुमधूर सफर प्रेक्षकांना करून देणारा हा सिनेमा ६ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे.