Join us

नर्गिस दत्त पुरस्कार घोषित दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांनी प्रतिक्रिया देत म्हटले,‘आनंद गगनात मावेना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 15:20 IST

नुकतीच ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनात करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर केले ...

नुकतीच ६५ राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा दिल्लीच्या शास्त्री भवनात करण्यात आली. चित्रपट क्षेत्रातील विविध विभागांसाठी हे पुरस्कार जाहीर केले आहेत.  या पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांच्या विभागासाठीही काही पुरस्कार मिळाले आहेत. यात मराठीचा आघाडीचा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी यांना ‘नर्गिस दत्त पुरस्कार’ने गौरवण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांच्याशी प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क केला असता ते म्हणाले,‘धप्पा या माझ्या मराठी चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्काराची घोषणा झाली त्यामुळे फार आनंद झाला आहे. माझ्यासोबतच माझ्या संपूर्ण टीमचाच हा पहिला चित्रपट आहे. पहिल्याच चित्रपटाची अशी नोंद घेतली जात आहे हे पाहून खरंच खूप बरं वाटतंय. लहान मुलांच्या भावविश्वावर हा चित्रपट बेतलेला असून यात सर्व लहान मुलांनीच उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांचेही मी यावेळी कौतुक करू इच्छितो. सगळया मेहनतीचे आणि कष्टाचे चीज झाल्यासारखे वाटते आहे. हा पुरस्कार म्हणजे सगळ्यांसाठीच एक कौतुकाची थाप आहे, असे म्हणण्यास हरकत नाही.’ ‘बापजन्म’,‘नौटंकी साला’,‘हाय जॅक’ यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन करणारा दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी मराठीतील नव्या दमाचा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. विविधांगी कथा आणि उत्कृष्ट कलाकारांची निवड ही त्याच्या कामाची वैशिष्ट्ये. प्रेक्षकांना वेगळया कथानकावर आधारित चित्रपटांची मेजवानी ते घेऊन येत असतात. त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे एकप्रकारे त्यांच्या कष्टाचे चीजच झाले आहे.