Join us

"मोराला पिसारा असतो तसं माणसाला इंग्लिशचा तुरा.."; नागराज मंजुळेंना 'मराठी'विषयी चिंता; म्हणाले-

By देवेंद्र जाधव | Updated: February 28, 2025 11:17 IST

नागराज मंजुळेंनी मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त करणारं मनोगत मांडलं. नागराज यांनी दिलेलं भाषण सध्या चर्चेचा विषय आहे (nagraj manjule)

काल (२७ फेब्रुवारी) मनसेने आयोजित केलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्तच्या कार्यक्रमात राज ठाकरेंनी (raj thackeray) अनेक मान्यवरांना बोलावलं होतं. त्यावेळी 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे (nagraj manjule) यांनी मनोगत व्यक्त करताना मराठी भाषेविषयी चिंता व्यक्त केली. नागराज म्हणाले की, "आनंद वाटतोय की भाषेचा गौरव करण्यानिमित्त आपण सर्वत्र एकत्र जमलोय. भाषा रोज बोलायची आणि एखाद्या दिवशी तिचा अभिमान बाळगायचा अशी गोष्ट नाही. तिचा अभिमान रोज बाळगला पाहिजे आणि ती अभिमानाने बोलली पाहिजे."

"परवा पुण्याच्या एका कार्यक्रमात आम्हाला एका सुत्रसंचालकाने विचारलं की, मराठी भाषा किती दिवस टिकेल? तर मला चिंताही वाटली आणि हसूही आलं. भाषा किती दिवस टिकेल असा प्रश्न खूप वर्षांपासून भेडसावतोय. खूप मोठ्या दिग्गजांनी भाषेबद्दलची चिंता व्यक्त केली. भाषा टिकेल की नाही, मराठीची पडझड होतेय असं वाटत राहतं.  जगभरातील कोणतीही भाषा संपली असेल तर त्यामागचं कारण असतं."

"भाषा जन्मण्याची आणि भाषा मरण्याची प्रक्रिया खूप प्रदीर्घ असते. म्हणजे एखादा माणूस एका क्षणी जन्मतो आणि एका क्षणी मरुन जातो. पण भाषा जन्मायला ५०० - १००० वर्ष लागत असतील. आणि मरायला पण खूप वेळ लागतो. एकदा जर आपली १० करोड माणसं मारुन टाकली तर मराठी लगेच मरेल. पण कुठल्याही कोपऱ्यात मराठी माणूस जीवंत आहे तर भाषा जगतेय." "भाषा मरण्याची प्रोसेस सुरु कधी होते याचा अंदाज कधीकधी बांधता येतो. भाषा बेइज्जत व्हायला लागली की भाषा मरायला सुरुवात होते. आपली मराठी बेइज्जत होतेय, याची चिंता मला वाटत राहते. मराठी बोलायला लाज वाटते, मध्येमध्ये इंग्रजी बोललं की वाटतं लय भारी आहे. मोराला पिसारा असतो तसं माणसाला इंग्लि शचा तुरा असतो. इंग्रजी बोललं की भारी आहे असं वाटत राहतं. मोबाईल लावला आणि तो आऊट ऑफ रीच असेल तर मराठी ज्याने डब केलंय ते खूप विनोदी आहे. म्हणजे पडझड कशी होते याचं ते उदाहरण आहे.""फोन नाही लागला तर बाई तिकडून म्हणते की, आपण ज्यांना फोन करत आहात तो कोणाशी बोलतंय, आता यात उद्गार पण नाही अन् प्रश्न पण नाही. आता मराठी माणसाला असं कळतं की, आपण ज्यांना फोन केलाय तो कोणाशी बोलतोय? तर तिथे कोणाशी तरी बोलत आहेत, असं पाहिजे. आपल्याला पण काय वाटत नाही. आपण ऐकतो. आपल्या मराठी माणसाची सवय आहे की आपल्याला हिंदी चालतं. उद्या आम्ही हिंदी पिक्चर केले तरी तुम्ही बघणार, मराठी नाही केले तरी काही फरक पडत नाही. त्यामुळे सगळी दिग्गज मंडळी आहेत म्हणून चिंता व्यक्त केली." पुढे नागराज मंजुळेंनी अरुण कोलटकरांची एक कविता सादर केली.

टॅग्स :नागराज मंजुळेराज ठाकरेमनसेमराठी भाषा दिनमराठीमराठी अभिनेता