रेशम टिपणीस (Resham Tipnis ) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. नुकतेच रेशमचा मुलगा मानवने आत्महत्या केल्याची खोटी बातमी व्हायरल झाली होती. ही बातमी पाहिल्यानंतर अभिनेत्री चांगलीच संतापली आहे. तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माझा मुलगा मानव ठणठणीत असल्याचे सांगितले आहे. तसेच तिने हे कृत्य करणाऱ्यां विरोधात कडक कारवाई करणार असल्याचंही सांगितलं.
खरेतर कांदिवली येथील एका गुजराती अभिनेत्रीच्या आठवी इयत्तेत शिकणाऱ्या मुलाने बुधावरी संध्याकाळी ५६व्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. आईने क्लासला जायला सांगितल्यामुळे रागाच्या भरात त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जाते. दरम्यान याच बातमीसाठी रेशम टिपणीस आणि तिचा मुलगा मानवचा फोटो एका वेब पोर्टलने वापरला. त्यानंतर ही बातमी व्हायरल झाली आणि सोशल मीडियावर खळबळ उडाली. त्यानंतर रेशम चांगलीच संतापली आणि तिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हे वृत्त फेटाळून लावले.
रेशम टिपणीसने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की, कृपया खोटी बातमी पसरवणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. बाप्पाच्या कृपेने माझा मुलगा मानव बरा आणि ठणठणीत आहे. पण हे ज्याने कोणी केले आहे, त्याच्यावर कडक कारवाई केली जाणार आहे. रेशमच्या या पोस्टनंतर नेटकऱ्यांनीदेखील संताप व्यक्त केला आहे.
मानव हा रेशम आणि तिचा एक्स पती संजीव सेठ यांचा मुलगा आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या खासगी आयुष्यामुळे ते चर्चेत आले होते.