मोनालिसा बागल करणार झाला बोभाटा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2016 13:33 IST
सध्या अनुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा या चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. कारण नुकतेच बॉलिवुडचा तगडा दिग्दर्शक रोहित शेट्टी ...
मोनालिसा बागल करणार झाला बोभाटा
सध्या अनुप जगदाळे दिग्दर्शित झाला बोभाटा या चित्रपटाची चर्चा खूपच रंगत आहे. कारण नुकतेच बॉलिवुडचा तगडा दिग्दर्शक रोहित शेट्टी याने हा चित्रपट प्रदर्शित होण्याचपूर्वीच झाला बोभाटाचा रिमेक करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे झाला बोभाटा या चित्रपटाची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. या चित्रपटात अभिनेत्री मोनालिसा बागल आणि मयूरेश पेम हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाविषयी अभिनेत्री मोनालिसा बागल लोकमत सीएनएक्सला सांगते, खरं तर माझा हा दुसरा चित्रपट आहे. यापूर्वी मी शशी देवधर या चित्रपटामध्ये सई ताम्हणकर हिचं बालपण साकारल होतं. नंतर मी शिक्षणामुळे इंडस्ट्रीपासून काही दिवस दूर होते. आता मात्र या चित्रपटाच्या माध्यमातून पुर्नआगमन केले आहे. मुख्य भूमिकेत मी पहिल्यांदाच झळकणार आहे. या चित्रपटात मी प्रिया नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. ही मुलगी ग्रामीण भागातील मध्यमवर्गीय परिवारातील आहे. ती एका मुलाच्या प्रेमात पडते. मात्र घरच्यासमोर आपल्या प्रेमाविषयी सांगण्यास थरथरते. कारण तिच्या घरात आधीच बोभाटा सुरू असतो, त्यामुळे पुन्हा हा बोभाटा निर्माण व्हायला नको म्हणून ती घाबरते. नक्की हा बोभाटा कशा प्रकारचा असणार आहे हे प्रेक्षकांना ६ जानेवारीला चित्रपटगृहात जाऊन पाहावे लागणार आहे. या चित्रपटात मोनालिसासोबत दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय कापरे, कमलेश सावंत, दिपाली अंबिकार, तेजा देवकर, रोहित चव्हाण, संग्राम साळवी या कलाकारांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहे. अनुप जगदाळे यांचा यापूर्वी गणवेश हा चित्रपटदेखील प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातदेखील तगडी कास्ट प्रेक्षकांना पाहायला मिळाली. मुक्ता बर्वे, स्मिता तांबे, किशोर कदम, शरद पोंक्षे, गुरू ठाकूर या कलाकारांचा समावेश होता. त्यामुळे प्रेक्षक ही या चित्रपटाची वाट आतुरतेने पाहत आहे.