Join us  

कोकणचो झिल, मुंबई गर्लच्या पडतलो प्रेमात?, मिताली आणि सुयशच्या 'हॅशटॅग प्रेम'चा ट्रेलर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2021 3:12 PM

‘हॅशटॅग प्रेम’ सिनेमाच्या माध्यमातून अशीच एक नवी कोरी प्रेमकहाणी उलगडणार आहे.

आजच्या फेसबुक आणि ट्विटरच्या जमान्यात तरूणाईची भाषाही काहीशी चिन्हांकीत झाली आहे. बोलीभाषेतही आता सोशल मीडियावरील शब्द आणि चिन्हांचा वापर होऊ लागला आहे, त्यामुळे कित्येकदा जणू काही प्रेमालाही सोशल मीडियाचा स्पर्श झाल्याचं पाहायला मिळत आहे. याचंच प्रतिबिंब आता रूपेरी पडद्यावरही उमटणार आहे. ‘हॅशटॅग प्रेम’ हे अनोखं टायटल असलेला मराठी सिनेमा येत्या १९ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या सिनेमाचा लक्षवेधी ट्रेलर सोशल मीडियावर प्रदर्शित झाला असून ‘हॅशटॅग प्रेम’ या चित्रपटाबाबतची उत्कंठा प्रचंड वाढली आहे.

शीर्षकावरूनच ‘हॅशटॅग प्रेम’ ही प्रेमकथा असल्याचं सहज लक्षात येतं. यासोबतच यात आजच्या युगातील प्रेमाच्या गुलाबी रंगाची उधळण करण्यात आली असल्याचीही जाणीव होते. मिताली मयेकर आणि सुयश टिळक ही नवी कोरी जोडी आणि त्यांची केमिस्ट्री रसिकांना सिनेमागृहांपर्यंत खेचून आणण्यासाठी पुरेशी असून् हीच या सिनेमाची मुख्य खासियत आहे. याची झलक ‘हॅशटॅग प्रेम’च्या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. दोघांमधील मैत्री आणि प्रेमाचं नातं अधोरेखित करत हा ट्रेलर कथानकातील इतरही घटनांवर प्रकाश टाकतो.

निर्माते अनिल गोविंद पाटील यांनी माऊली फिल्म प्रोडक्शनच्या बॅनरखाली ‘हॅशटॅग प्रेम’ची निर्मिती केली असून, वितरक समीर दीक्षित आणि ऋषिकेश भिरंगी यांची अचूक साथ लाभल्यानं हा सिनेमा पिकल एंटरटेनमेंटच्या सहकार्यानं रसिक दरबारी प्रस्तुत केला जाणार आहे. दिग्दर्शक राजेश बाळकृष्ण जाधव यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे.        

‘हॅशटॅग प्रेम’ हे सिनेमाचं शीर्षक लक्ष वेधून घेणारं असून, एका नव्या जोडीची केमिस्ट्री हा या सिनेमाचा प्लस पॉइंट ठरणार आहे. निखिल कटारे यांनी या सिनेमाची कथा आणि पटकथा लिहिली आहे. सिनेमातील गीतांनी प्रविण कुवर यांचे संगीत लाभले असून गायक-संगीतकार रोहित राऊतनं पार्श्वसंगीत दिलं आहे. या सिनेमाचे कार्यकारी निर्माते महेश भारंबे असून कला दिग्दर्शनाची बाजू केशव ठाकूर यांनी सांभाळली आहे. सिनेमॅटोग्राफी राजा फडतरे यांची असून येत्या १९ मार्चला ‘हॅशटॅग प्रेम’ संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

टॅग्स :मिताली मयेकरसुयश टिळक