Join us  

मेमरी कार्ड चित्रपट होणार २ मार्चला प्रदर्शित

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2018 9:05 AM

कोकणचं निसर्गरम्य सौंदर्य, चार मित्रांची अनोखी मैत्री, तरुणाईच्या उंबरठ्यात पाय ठेवताना हळूवार उमलणारं प्रेम आणि अतिउत्साहात एका चौकडीची उडालेली ...

कोकणचं निसर्गरम्य सौंदर्य, चार मित्रांची अनोखी मैत्री, तरुणाईच्या उंबरठ्यात पाय ठेवताना हळूवार उमलणारं प्रेम आणि अतिउत्साहात एका चौकडीची उडालेली धांदल असं एकंदरीत कथासार असलेला 'मेमरी कार्ड' हा सिनेमा येत्या २ मार्च २०१८ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. बदलत्या वेळेनुसार झालेले बदल आचरणात आणताना काहीसा वेळ लागतोच. मात्र या बदलांमुळे आपल्यावर होणारे परिणाम या सिनेमात हसत खेळत मांडलेत. स्मार्ट फोन वापरण्यासाठी स्मार्टनेस असावा लागतो आणि तो नसला की होणारी पंचाईत सिनेमात दाखवली आहे. मात्र आपल्या माणसांच्या संपर्कात राहण्यासाठी फोनची गरज असतेच असे नाही हेच 'मेमरी कार्ड' मध्ये अनुभवायला मिळणार आहे. अॅडलिब्स प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या या सिनेमाची निर्मिती, दिग्दर्शन आणि संगीत प्रितेश कामत -मितेश चिंदरकर या जोडगोळीने केले आहे. मराठी चित्रपट क्षेत्रात दाखल झालेल्या प्रितेश-मितेश यांचा हा पहिलाच सिनेमा आहे. सिनेमाची कथा मनाली काळे आणि श्याम सामंत यांनी लिहिली आहे. संजय खापरे, सुनील तावडे या प्रस्थापित कलाकारांसोबतच रिषभ पुरोहित, विभूती कदम, अपूर्वा परांजपे, प्रणाली चव्हाण, आदित्य नाक्ती, कुणाल शिंदे, हितेश कल्याणकर, दिनेश पाटील, कल्पना बांदेकर, विजय चव्हाण, अक्षता कांबळी या नवोदित कलाकारांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाचे संकलन विजय कोचीकर, कला दिग्दर्शन प्रवीण चिंदरकर, छायांकन देवेंद्र तन्वर यांनी केले आहे. कोकणातील एका लहान गावात दहावीपर्यंत शिकलेला मुलगा कॉलेजसाठी मोठ्या शहरात आल्यावर त्याची होणारी चलबिचल या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. तसेच अजिबात ओळख नसताना एखादी मुलगी नव्याने शहरात आलेल्या आपल्या मित्राला किती सहज मनमोकळे व्हायला मदत करते अशा अनेक गोष्टी सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. येत्या व्हॅलेंटाइन्स डेच्या निमित्ताने आपल्या व्हॅलेंटाईनला गिफ्ट म्हणून हे मेमरी कार्ड तुम्ही नक्की देऊ शकता. सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या धडाकेबाज आवाजातील गणपती बाप्पाचे खास गाणे आणि पुण्यकर उपाध्यायचा एनर्जेटिक डान्स परफॉर्मन्स देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. गायिका मयुरी नेवरेकर यांनी जीवलग दोस्तांची यारी दोस्ती दाखवणारे क्लिक...क्लिक... हे गाणं गायलं आहे. तसेच जावेद अली, महालक्ष्मी अय्यर आणि सायली पाटील यांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत.