महेश मांजरेकर हे मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेते. महेश यांनी आजवर विविध सिनेमांमध्ये काम केलंय. याशिवाय अनेक सिनेमांची निर्मिती आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. महेश यांना काही वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं. त्यामुळे सर्वांना धक्का बसला. पण महेश यांनी अजिबात न घाबरता कॅन्सरसारख्या असाध्य आजारावर मात केली. महेश यांची कॅन्सर ट्रीटमेंट घेताना अवस्था काय होती, याचा खुलासा त्यांची पत्नी मेधा मांजरेकर यांनी केला आहे.
कॅन्सरचं निदान झाल्यावर महेशने काय केलं?
मेधा मांजरेकर यांनी देसी पॉड या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, "महेश जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा डॉक्टरांनी मला विचारलं की, याला माहितीये का त्याला काय झालंय ते? महेश चार-पाच माणसांना घेऊन बसला होता. त्याच्या मिटिंग आणि गप्पा चालू होत्या. त्यादिवशी महेशला कॅन्सरचं निदान झालं होतं. तोच असा होता त्यामुळे आम्ही पण शांत होतो. माझ्या आईलाही कॅन्सर झाला होता. आईने पण कॅन्सरशी असाच लढा दिला होता. यावेळी तुम्ही मानसिकरित्या खूप स्ट्राँग राहायला हवं. कॅन्सरच्या ट्रीटमेंटला खूप त्रास होतात. किमो करताना खूप वेदना होतात. पण तुम्ही जर ते सकारात्मक पद्धतीने घेतलं तर सगळं छान होतं."
अशाप्रकारे मेधा यांनी महेशविषयी खुलासा केला. महेश मांजरेकर यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर, त्यांनी 'जुनं फर्निचर', 'देवमाणूस' या मराठी सिनेमांमध्ये काम केलं . याशिवाय महेश यांनी 'ठग लाईफ' या साऊथ सिनेमात कमल हासनसोबत काम केलं. महेश मांजरेकर यांच्या आगामी 'वेडात मराठे वीर दौडले सात' या सिनेमाची सर्वांना खूप उत्सुकता आहे. महेश यांनी बिग बॉस मराठीचे चारही सीझन त्यांच्या सूत्रसंचालनाने गाजवले. बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये ते दिसले नाहीत. पण आता आगामी सीझनचं सूत्रसंचालन महेश करणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे.