Join us  

आशुतोषच्याआठवणीने भावुक झाली मयुरी देशमुख, पतीच्या निधनानंतर पहिल्यांदा शेअर केला हा व्हिडीओ

By रूपाली मुधोळकर | Published: October 15, 2020 10:28 AM

आशुतोषच्या अकाली निधनाने मयुरीला जबर धक्का बसला होता. मयुरी अद्यापही या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतेय.

ठळक मुद्देआशुतोष भाकरेने 29 जुलैला सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आयुष्य संपवले होते.

‘खुलता कळी खुलेना’ या मराठी मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री मयुरी देशमुख हिचा पती आशुतोष भाकरेने गेल्या 29 जुलै रोजी नांदेडमधील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. आशुतोष दीर्घकाळापासून डिप्रेशनमध्ये होता आणि  डिप्रेशनमुळेच त्याने   हे टोकाचे पाऊल का उचलले होते. आशुतोषच्या अकाली निधनाने मयुरीला जबर धक्का बसला होता. मयुरी अद्यापही या धक्क्यातून स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करतेय. 11 ऑगस्टला आशुतोषचा वाढदिवस होता. या वाढदिवशी मयुरीने पतीच्या स्मरणार्थ एक भावूक पोस्ट लिहिली होती. तेव्हापासून ती सोशल मीडियापासून लांब होती. पण आता पुन्हा एकदा मयुरीने एक व्हिडीओ शेअर केला आहे. खरे तर हा व्हिडीओ तिने तिच्या खास मैत्रिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोस्ट केलाय. पण यात ती पूर्णवेळ आशुतोषबद्दलच बोलतेय.

व्हिडीओत मयुरी म्हणते,हॅपी बर्थ डे श्वेता, माझ्याकडून आणि आशुकडून तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा. आशु फार व्यक्त होत नव्हता. त्यामुळे तू त्याच्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण होतीस, हे त्याने कधीच तुला सांगितले नसेल. विशेषत: गेल्या वर्षभरात तू आमच्यासाठी जे काही केलेस, त्याबद्दल मी तुझी आभारी आहे. तू माझी बेस्ट फ्रेन्ड असूनही तू आशुला त्याच्या पद्धतीने समजून घेतलेस. कधीही जज न करता त्याच्यासाठी खूप काही केलेस. हा आमचा प्रवास होता, तसा तुझाही होता. डिप्रेशनला कसे समजून घ्यायचे. त्याला कसे सामोरे जायचे, हे सगळे आम्ही शिकत असताना तू सुद्धा या प्रवासात आमच्यासोबत होती. मला माहित नाहीस,तुझ्याशिवाय आम्ही अनेक टप्पे कसे पार केले असते. तू फक्त मागून मार्गदर्शन केले नाहीस तर आशुसोबत तू सुद्धा सगळे भोगले. तू मैत्री खºया अर्थाने निभवलीस. तू अनेकदा आमच्यासाठी नागपूरहून मुंबईला आलीस. तुझ्यामुळे आमचा प्रवास बºयाचअंशी सुसह्य झाला. आपले प्रयत्न फसले, त्याचे दु:ख आमच्याइतकेच तुलाही आहे. आशु आज आपल्यासोबत नाही. पण कृपा करून तू हताश होऊ नकोस. कारण तुझ्यासारख्या व्यक्तिची जगात खूप गरज आहे. मला विश्वास आहे, आशु एक तारा बनून अवकाशात चमकत असेल. तुझ्यासारखी मैत्रिण मला मिळाल्याबद्दल आशुला खूप अभिमान होता आणि असेल. आनंदी राहा. खूप खूप प्रेम...

आशुतोष व मयुरी यांनी 20 जानेवारी 2016 मध्ये लग्नगाठ बांधली होती.  आशुतोष भाकरेने 29 जुलैला सकाळी 11 ते 12 च्या दरम्यान राहत्या घरीच गळफास घेऊन आयुष्य संपवले होते. आशुतोषचे आई-वडील नांदेडमधील प्रसिद्ध डॉक्टर आहेत. मयुरी आणि आशुतोषमध्ये कोणतेही मतभेद नव्हते. लॉकडाऊनमध्ये दोघेही एकत्र होते.  आशुतोष भाकरेने  भाकर, इच्यार ठरला पक्का या चित्रपटात भूमिका साकारली होती.  जुन-जुलै  या बहुचर्चित नाटकाची निर्मिती त्याने केली होती.

आशुडा,  मला अर्ध्या रस्त्यात सोडून गेलास...!  पतीच्या निधनानंतर मयुरी देशमुखची पहिली पोस्ट

नैराश्याला चेहरा नसतो, दुःख तर खूप आहे पण..; अभिनेता आशुतोष भाकरेच्या आईची भावनिक पोस्ट

 

टॅग्स :मयुरी देशमुख