Join us  

५१व्या ‘इफ्फी’ चित्रपट महोत्सवामध्ये प्रवास सिनेमाची एंट्री

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2020 4:59 PM

अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत या चित्रपटात विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकार आहेत.

‘द इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’मध्ये (इफ्फी) होणाऱ्या चित्रपटांची निवड हा नेहमीच चित्रपटकर्मीसाठी औत्सुक्याचा विषय असतो. यंदाच्या ५१व्या ‘इफ्फी’ चित्रपट महोत्सवामध्ये ‘इंडियन पॅनारोमा फिचर फिल्म २०२०’ च्या विभागात शशांक उदापूरकर दिग्दर्शित व अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे यांच्या अभिनयाने नटलेल्या ‘प्रवास’ या चित्रपटाची निवड झाली आहे. 

प्रवास’ची निवड ‘इफ्फी’ या मानाच्या महोत्सवात होणे ही आमच्यासाठी बहुमानाची गोष्ट असल्याचे या चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक शशांक उदापूरकर यांनी सांगितले. आनंददायी प्रवासाची गोष्ट सांगत आयुष्याचे मर्म सांगणारा अशोक सराफ, पद्मिनी कोल्हापूरे अभिनीत या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. ‘इफ्फी’ मध्ये सुद्धा हा चित्रपट आपला वेगळा ठसा उमटवेल असा विश्वास या चित्रपटाचे निर्माते ओम छंगानी यांनी व्यक्त केला.

आयुष्यातील प्रत्येक लढाई निर्धाराने लढण्यातच खरी मजा असते, हाच खरा ‘प्रवास’ असतो हा विचार नकळतपणे देणाऱ्या या चित्रपटाची निर्मिती ‘ओम छंगानी फिल्म्स’ यांची आहे. अशोक सराफ व पद्मिनी कोल्हापुरे यांच्यासोबत या चित्रपटात विक्रम गोखले, रजत कपूर, शशांक उदापूरकर आदि कलाकार आहेत.‘जे शेष आहे ते विशेष आहे’ असं आयुष्याचे मर्म सांगणाऱ्या सिनेमात अशोक सराफ आणि पद्मिनी कोल्हापुरे यांच्या नात्यातले सुंदर क्षण पहायला मिळतात.

'प्रवास’ या चित्रपटाच्या लेखनाची व दिग्दर्शनाची जबाबदारी शशांक उदापूरकर यांनी सांभाळली होती. छायांकन सुरेश देशमाने यांचे आहे. हिंदीतील सुप्रसिद्ध संगीतकार जोडी सलीम सुलेमान यांचा मराठी चित्रपटसृष्टीतला संगीत दिग्दर्शक म्हणून ‘प्रवास’ या निमित्ताने सुरु झाला होता.  गीतलेखन गुरु ठाकूर यांचे होते.कलादिग्दर्शक महेश साळगांवकर तर संकलन संजय सांकला यांचे होते. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे असून  रंगभूषा श्रीकांत देसाई तर वेशभूषा ताशीन अन्वारी, दिप्ती सुतार यांची होती.

टॅग्स :प्रवासपद्मिनी कोल्हापुरे