Join us

"दरवर्षी वाढदिवसाला दीदींचा न चुकता फोन, आज तो कॉल..." मराठी दिग्दर्शकाची भावूक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2023 9:22 AM

दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा आज वाढदिवस.

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील वात्सल्यपूर्ण अभिनेत्री सुलोचना लाटकर (Sulochana Latkar) यांनी वयाच्या ९४ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  त्यांनी अनेक सिनेमात प्रेमळ आईची भूमिका साकारली होती जी सर्वांनाच आपलीशी करुन जायची. त्यांच्या निधनानं मराठी तसंच हिंदी सिनेसृष्टी पोरकी झाली आहे. प्रसिद्ध मराठी सिनेदिग्दर्शक महेश टिळेकर (Mahesh Tilekar) यांनी दीदींना श्रद्धांजली वाहत आठवणींना उजाळा दिला आहे. 'दरवर्षी वाढदिवसाला फोन करणाऱ्या दीदी यावेळी एक दिवस आधीच निघून गेल्या तेही कायमचं', अशा शब्दात ते व्यक्त झाले आहेत.

दिग्दर्शक महेश टिळेकर यांचा आज वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसाला दरवर्षी न चुकता सुलोचना दीदी फोन करायच्या. यावर्षी महेश यांच्या वाढदिवसाच्या एक दिवस आधीच दीदींनी जगाचा निरोप घेतला. महेश टिळेकर यांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत लिहिले, 

"तो फोन कॉल आता कधीच नाहीदरवर्षी न चुकता पाच जूनला माझ्या वाढदिवसादिवशी शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी येणारा सुलोचना दिदिंचा फोन कॉल आता कधीच येणार नाही ही भावनाच मनाला खोलवर दुःख देणारी आहे.अगदी न चुकता 5 जूनला दुपारच्या वेळेत सुलोचना दीदींच्या येणाऱ्या कॉल मध्ये कधीच खंड पडला नाही.

त्यांच्या 90 व्या वाढदिवसानिमित्त माझ्या मराठी तारका टीम बरोबर दीदींच्या घरी जाऊन त्यांचा वाढदिवस आम्ही साजरा केला होता.. वार्धक्यामुळे त्यांच्या शरीराच्या हालचाली जरी मंदावल्या होत्या तरी त्यांचा आवाज खणखणीत होता आणि जुन्या गोष्टी त्यांना सगळ्या आठवत होत्या. अधून मधून त्यांची मी सदिच्छा भेट घ्यायचो आशिर्वादासाठी वाकून नमस्कार केल्यावर  मायेने डोक्यावरून फिरणारा तो हात, त्या हाताचा स्पर्श आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करताना बळ देणारा असायचा.

चित्रपटसष्टीतील माझ्या शून्यापासून सुरू झालेल्या प्रवासाच्या सुलोचना दीदी एक साक्षीदार होत्या.मराठी तारका कार्यक्रमाच्या पहिल्या शो ला , मराठी तारका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला, माझ्या वन रूम किचन सिनेमाच्या प्रीमियर शो ला ही दीदी आशीर्वाद द्यायला उपस्थित होत्या.सिनेमातून अभिनय करणे त्यांनी बंद केलं होतं तरी माझ्या आग्रहा खातर 2010 मध्ये माझ्या ' लाडी गोडी ' या सिनेमातून त्यांनी पुनरागमन केलं. यात गेस्ट ॲपीरन्स म्हणून भरत जाधवच्या आईची भूमिका केली होती हा त्याचा अखेरचा चित्रपट.

टिव्हीवर माझा एखादा कार्यक्रम, चित्रपट त्यांनी पाहिला की त्या हमखास फोन करायच्या. 2007 मध्ये मराठी तारका हा माझा कार्यक्रम पाहून त्यांनी मला एक भारीतलं घड्याळ भेट म्हणून दिले होते.तेंव्हा फोन करून मी  त्यांना सांगितलं " दीदी मी हातात  घड्याळ घालतच नाही, तुम्ही कश्याला उगाच खर्च केला" त्यावर " तुम्ही बाहेर कुठं गेलात की प्रेमाने माझ्यासाठी साडी आणता मग  माझाही हक्क आहे तुम्हाला भेट द्यायचा असे आपलेपणाने त्यांनी सांगितल्यावर मी एक मौल्यवान नजराणा म्हणून ते घड्याळ जपून ठेवलं आहे पण आता त्यातील वेळ थांबली आहे.. 

भावपूर्ण श्रद्धांजली सुलोचना दीदीमहेश टिळेकर

दीदींच्या पार्थिवावर आज सायंकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत.

टॅग्स :सुलोचना दीदीमराठी अभिनेतामृत्यूमराठी चित्रपट