Ravindra Mahajani:मराठी चित्रपटसृष्टीतील ‘हॅण्डसम हंक’, चॉकलेट बॉय अशी बिरुदावली मिरवणारे, सत्तर-ऐंशीच्या दशकात आपल्या दमदार भूमिकांनी चित्रपटसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते रविंद्र महाजनी यांचा आज जन्मदिवस. रुबाबदार व्यकिमत्व आणि स्टाईलमुळे त्यांना मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना म्हटलं जायचं. अगदी शाळेत असतानाच अभिनय क्षेत्रात यायचं असं त्यांनी मनोमन ठरवलं होतं.
रविंद्र महजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. २ वर्षांचे असताना त्यांचे वडील नोकरीसाठी मुंबईला स्थायिक झाले. रविंद्र महजनींचे वडील ह.रा.महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सिनेसृष्टीची वाट धरली. मात्र, नियतीच्या मनात काही औरच होतं. वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. असंही सांगण्यात येतं की, आपल्या कुटुंबासाठी रात्री ते टॅक्सी चालवायचे. तर अभिनयाची आवड जोपासण्यासाठी दिवसा ते निर्मात्यांना भेटायचे. त्याचदरम्यान, मधुसूदन कालेलकर यांच्या ‘जाणता अजाणता’ या नाटकातून महाजनी यांना पहिल्यांदाच संधी मिळाली. त्यात त्यांनी केलेल्या कामाचं प्रचंड कौतुक झालं होतं. मात्र, 'झुंज' या चित्रपटातून त्यांनी रुपेरी पडद्यावर पाऊल ठेवलं. त्यानंतर या नायकाकडे चित्रपटांची रांगच लागली. ‘लक्ष्मी’, ‘लक्ष्मीची पावलं’, ‘देवता’, असे अनेक यशस्वी चित्रपट महाजनींच्या नावावर झाले.‘गोंधळात गोंधळ’, ‘मुंबईचा फौजदार’, असे विनोदी ढंगाच्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. अखेरचे ते अशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘पानिपत’चित्रपटात दिसले. त्यांचा मुलगा गश्मीर महाजनी हा देखील मराठी इंडस्ट्रीतील सध्याचा आघाडीचा अभिनेता आहे.
चटका लावणारा अंत...
रवींद्र महाजनी यांचं १५ जुलैला निधन झालं. तळोजा येथील फ्लॅटमध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. दोन दिवस त्यांचा मृतदेह बंद खोलीत होता. रवींद्र महाजनी कुटुंबीयांपासून वेगळे एकटेच राहत होते. त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी येऊ लागल्याने शेजारी राहणाऱ्या नागरिकांनी पोलिसांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला होता.