तेजस्विनी पंडित ही मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या तेजस्विनीने सिनेसृष्टीत स्वत:चं स्थान निर्माण केलं. तेजस्विनीचा चाहता वर्ग मोठा असून ती सोशल मीडियावरही सक्रिय असतं. नवीन प्रोजेक्ट आणि वैयक्तिक आयुष्याबाबत ती चाहत्यांना माहिती देत असते. सध्या तेजस्विनीच्या एका पोस्टची चर्चा रंगली आहे.
तेजस्विनीने तिचे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोला तिने दिलेल्या कॅप्शनने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या कॅप्शनमध्ये तेजस्विनीने लवकर बरं व्हायचंय असं म्हटलं आहे. तर कॅप्शनमधून तिने यावर्षीचं तंदुरुस्त राहण्याचं ध्येय असल्याचंही म्हटलं आहे. "काहीच कृत्रिम नको…! सकाळचा चेहरा असाच असतो नाही का? सध्या शरीरात inflammation खूप आहे, त्यावर काम चालू आहे. लवकर बरं व्हायचं आहे. Health First हेच ह्यावर्षीचं resolution नाही, ध्यास आहे", असं कॅप्शन तिने या पोस्टला दिलं आहे.
अभिनेत्री असण्याबरोबरच तेजस्विनी एक निर्माती आणि उद्योजिकादेखील आहे. मराठीबरोबरच तिने बॉलिवूड आणि साऊथमध्येही काम केलं आहे. 'आदिपुरुष' या हिंदी सिनेमात ती झळकली होती. तर 'अहो विक्रमार्का' या सिनेमातून तिने साऊथमध्ये पदार्पण केलं.