Join us  

"तुमची पत्नी पण अभिनेत्याबरोबर...", शरीरसुखाची मागणी करणाऱ्याला श्रुतीने दिलेलं सडेतोड उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 3:26 PM

श्रुती मराठेला मराठी सिनेइंडस्ट्रीत आलेला कास्टिंग काऊचचा अनुभव, म्हणाली, " मी त्यांना विचारलं तुमची बायको..."

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री श्रुती मराठे अभिनयाबरोबरच तिच्या बिनधास्त स्वभावामुळेही ओळखली जाते. 'राधा ही बावरी' मालिकेतून श्रुती घराघरात पोहोचली. या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर अनेक सिनेमांतही श्रुती झळकली. पण, मराठी सिनेसृष्टीत तिला कास्टिंग काऊचचाही अनुभव आला. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत श्रुतीने याबाबत भाष्य केलं आहे. 

श्रुतीने मराठी सिनेसृष्टीतील धक्कादायक अनुभव 'आरपार' या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितला. ती म्हणाली, "मुलगी म्हणून मला खूप नाही पण थोड्या फार मर्यादा जाणवल्या. पण, तुम्ही जर एखादी गोष्ट सांगितली तर एवढा प्रॉब्लेम येत नाही. अनेक वर्षांपूर्वी मला मराठीत कास्टिंग काऊचचा अनुभव आला होता. कलाविश्वात येऊन मला काही वर्ष झाली होती. मी अगदीच नवीनही नव्हते. नटी उपलब्ध असतात, असा आपल्या सिनेइंडस्ट्रीबद्दल गैरसमज आहे. एकतर हे ऐकायलाच इतकं घाण वाटतं. हे कोणी पसरवलं? कुठून सुरू झालं? एखादं काम मिळवण्यासाठी तुम्हाला अमूक एक गोष्ट करावीच लागते, हे कुठून आलं?" 

"एका चित्रपटासाठी मला फायनान्सर भेटायला आले होते. त्यांनी मला सिनेमासाठीचं माझं मानधन विचारलं. आम्ही दोघंच बोलत होतो. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की तू जर माझ्याबरोबर हे केलंस तर मी तुला पाहिजे तितकं मानधन देईन. हे ते माझ्या तोंडावर म्हणाले. दोन-तीन मिनिटांसाठी मी ब्लँक झाले होते. मला घाम सुटायला लागला. याआधी असं कधीच घडलं नव्हतं. त्यामुळे अशा परिस्थितीत काय करायचं, हे मला कळत नव्हतं. मग मला वाटलं की याला काहीतरी उत्तर दिलं पाहिजे. मी त्यांना म्हणाले की अच्छा, म्हणजे मी जर तुमच्याबरोबर झोपले तर तुमची बायको मुख्य अभिनेत्याबरोबर झोपणार का? हे ऐकल्यावर ते म्हणाले की हे तू काय बोलतेस? पुढे त्यांना म्हणाले, मी असं काहीतरी करते ही माहिती तुम्हाला कुठून मिळाली? कोणाशी बोलताना थोडा तरी अभ्यास करत जा," असा अनुभव श्रुतीने शेअर केला. 

'तप्तपदी', 'शुभ लग्न सावधान', 'सनई चौघडे', 'सरसेनापती हंबीरराव', 'धर्मवीर' या सिनेमांत श्रृतीने काम केलं आहे. मराठीबरोबरच तिने तमिळ सिनेसृष्टीतही काम केलं आहे. सध्या श्रुती निर्मिती क्षेत्रात काम करत आहे.  

टॅग्स :श्रुती मराठेसेलिब्रिटीसिनेमा