Join us  

शाहरुखबरोबर फोटोत दिसणाऱ्या 'या' मराठी अभिनेत्रीला ओळखलं का? म्हणालेली, "किंग खानने माझा हात हातात घेऊन..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2023 1:38 PM

शाहरुखची चाहती असलेल्या मराठी अभिनेत्रीची एका कार्यक्रमादरम्यान किंग खानशी भेट झाली होती. तिने शाहरुखबरोबरच्या गोड आठवणीचा फोटो शेअर करत त्याच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे.

प्रेक्षकांच्या मनाबरोबरच बॉलिवूडवर राज्य करणाऱ्या किंग खानचा आज वाढदिवस आहे. कोणताही गॉडफादर नसताना अपार कष्ट आणि टॅलेंटच्या जोरावर बॉलिवूडमध्ये नाव कमावणाऱ्या शाहरुख खानचे लाखो चाहते आहेत. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते शाहरुखच्या मन्नतबाहेर गर्दी करताना दिसतात. अनेक मराठी कलाकारही शाहरुखचे चाहते आहेत. शाहरुखची चाहती असलेल्या मराठी अभिनेत्रीची एका कार्यक्रमादरम्यान किंग खानशी भेट झाली होती. 

शाहरुखच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर शुभेच्छांचा महापूर आला आहे. अनेक चाहते पोस्टद्वारे किंग खानला शुभेच्छा देत आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीनेही शाहरुखबरोबरच्या गोड आठवणीचा फोटो शेअर करत त्याच्यावरील प्रेम व्यक्त केलं आहे. तिचा शाहरुखबरोबरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सायली संजीव आहे. सायलीने हा फोटो शेअर करत शाहरुखला खास शुभेच्छा दिल्या आहेत. 

एका मुलाखतीत सायली संजीवने या फोटोमागची गोष्ट सांगितली होती. शाहरुख आणि सायली संजीवची भेट तिच्या एका मित्राच्या लग्नादरम्यान झाली होती. किंग खानच्या भेटीचा किस्सा सांगताना सायली म्हणाली, “मी माझ्या मित्राच्या लग्नाला गेले होते. लग्न आणि रिसेप्शन झाल्यानंतर मी तिथून निघण्याच्या तयारीत होते. पण हॉटेलमधील सगळ्या लिफ्ट बंद करुन ठेवल्या होत्या. त्यामुळे मी तिथेच अडकून पडले होते. याचा विचार करत असतानाच एक व्यक्ती माझ्या डोळ्यासमोरुन आत गेली. तो शाहरुख खान होता. मी वेड्यासारखी बघत उभे होते. माझ्या मित्राला आणि त्याच्या कुटुंबियांना भेटून शाहरुख बाहेर आला. माझ्या मित्राने त्याला माझी ओळख करुन दिली. त्यानंतर माझा हात हातात घेऊन तो बोलत होता. पण मी नुसतेच शाहरुखकडे पाहत होते. तो काय बोलला, यातलं मला एक अक्षरही आठवत नाही. पण कोणीतरी हे सुंदर क्षण कॅमेऱ्यात टिपले. आणि याचे सगळे फोटो माझ्याकडे आहेत”.

'काहे दिया परदेस' मालिकेतून सायली घराघरात पोहोचली. त्यानंतर ती 'शुभमंगल ऑनलाईन' मालिकेत झळकली होती. सायलीने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. 'गोष्ट एका पैठणीची', 'बस्ता', 'मन फकिरा', 'झिम्मा', 'हर हर महादेव', 'आटपाडी नाईट्स' या चित्रपटांत ती महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसली. 

टॅग्स :शाहरुख खानसायली संजीवमराठी अभिनेता