Join us  

महिलांविषयी भाष्य करणारा 'Y'; दमदार कथानक घेऊन मुक्ता बर्वे पुन्हा सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: May 09, 2022 4:16 PM

Mukta Barve: मदर्स डेचं निमित्त साधत मुक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून तिने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.

मराठी कलाविश्वातील गुणी आणि अभ्यासू अभिनेत्री म्हणून कायम मुक्ता बर्वेकडे (Mukta Barve) पाहिलं जातं. उत्तम अभिनय आणि दर्जेदार कथानकाची निवड करणाऱ्या मुक्ताचा प्रत्येक चित्रपट सोशल मीडियावर चर्चिला जातो. त्यामुळे आजपर्यंत तिच्या अनेक चित्रपटांची दखल चित्रपट समिक्षकांनी वगैरे घेतली आहे. मध्यंतरी मालिकेमुळे चर्चेत येत असलेल्या मुक्ताने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. 

मदर्स डेचं निमित्त साधत मुक्ताने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली. या पोस्टच्या माध्यमातून तिने तिच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यावेळीदेखील मुक्ता एक दमदार कथानक घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मुक्ताच्या आगामी चित्रपटाचं नाव 'वाय' (Y) असं आहे. "मातृदिनानिमित्त समाजातील प्रत्येक 'आईला बाई म्हणून आणि बाईला माणूस' म्हणून समजून घेतलं पाहिजे", असं आवाहन तिने या चित्रपटाच्या निमित्ताने केलं आहे.

"बाईच्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर,  कधी तिच्यावर बंधनं लादून, कधी भीती तर कधी स्वप्न दाखवून, धर्म - परंपरा - संस्कृती या सर्वांचं ओझं वाहण्याची जबाबदारी तिच्यावर सोपवून आणि हे तिला आणि इतरांना कळूच नये म्हणून की काय, पावलापावलावर तिच्या असण्याचंच गौरविकरण करून बाईचं माणूसपणच हिरावून घेण्याची एक सर्वमान्य व्यवस्था आपल्या आजूबाजूला गेली हजारो वर्षे अस्तित्वात आहे", असं मुक्ताने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, अजित सुर्यकांत वाडीकर दिग्दर्शित 'वाय' हा चित्रपट  २४ जून २०२२ रोजी संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात मुक्ता महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. मात्र, तिच्यासोबत अन्य कोणते कलाकार झळकणार हे मात्र गुलदस्त्यात आहे.

टॅग्स :मुक्ता बर्वेसेलिब्रिटीसिनेमा