Join us  

वयाच्या 16 व्या वर्षी मराठी अभिनेत्रीने अनोळखी आजोबांचा केला सांभाळ, आईचा विरोध झुगारत...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 3:43 PM

सुमारे २० वर्ष अभिनेत्रीने आजोबांना सांभाळलं, नंतर एक दिवस तिचा हात हातात घेत आजोबांनी शेवटचा श्वास घेतला

मनोरंजनसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत जे अनेक सामाजिक कार्य करतात मात्र कुठेच त्याची साधी वाच्यताही करत नाही. अशीच एक मराठी अभिनेत्री जिच्या एकावेळी ५ मालिका हिट झाल्या आहेत. खूप कमी वयात घराची जबाबदारी आल्याने तिने नाटकात काम करायला सुरुवात केली होती. इतकंच नाही तर वयाच्या १६ व्या वर्षी तिने एका अनोळख आजोबांचा २० वर्ष सांभाळही केला होता. कोण आहे ती अभिनेत्री?

स्वामिनी, बंदिनी, दामिनीसह एकाचवेळी अनेक मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री अर्चना नेवरेकर (Archana Nevrekar). त्यांची वेगळी ओळख सांगण्याची गरजच नाही. सौंदर्य आणि अभिनय कौशल्य यामुळे त्यांनी प्रेक्षकांवर अधिराज्य गाजवलं. त्यांनी बालवयातच नाटकात काम करायला सुरुवात केली होती. त्यांना चार बहिणी आहेत. खूप कमी वयात त्यांनी वडिलांना गमावलं. सगळी जबाबदारी आईवर आली. त्यामुळे मुलींनीही कमी वयात काम करायला सुरुवात केली होती. तेव्हा नीलकांती पाटेकर, सुलभा देशपांडे या दिग्गज मराठी अभिनेत्रींनी अर्चना नेवरेकर यांना नाटकात संधी दिली होती. नंतर त्यांनी मालिका, सिनेमेही केले आणि कुटुंबाला हातभार लावला. दरम्यान अर्चना नेवरेकर यांनी निर्मिती क्षेत्रातही पदार्पण केलं. या सगळ्या कामामुळे त्यांची आर्थिक अडचण दूर झाली होती. 

खूप कमी वयात अर्चना नेवरेकर यांना जबाबदारीची जाण आली होती. त्यामुळेच त्यांनी एका अनोळखी आजोबांनाही २० वर्ष सांभाळलं होतं. गोगटेवाडीत एक आजोबा राहायचे. त्यांचा भाचा परदेशात असायचा. नाटकाच्या निमित्ताने त्यांची अर्चनाशी ओळख झाली होती. अर्चनाही त्यांना शूटिंगसाठी घेऊन जायच्या. एका चित्रपटात तर त्यांनी छोटी भूमिकाही साकारली. मात्र ते आजोबा लग्न न झाल्याने खूपच एकटे होते. त्यांनी एकदा आत्महत्येचाही प्रयत्न केला तेव्हा अर्चना यांनी आजोबांना आधार दिला आणि त्यांची जबाबदारी उचलली होती. तेव्हा अर्चनाच्या आईने कडाडून विरोध केला होता. मात्र त्यांनी आईचा विरोध झुगारत २० वर्ष त्या आजोबांचा सांभाळ केला. एक दिवस त्यांनी अर्चनाचा हात हातात घेत शेवटचा श्वास घेतला. यानंतर अर्चना यांनी 'स्नेहधाम  ट्र्स्ट'ची स्थापना केली होती.

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पठारे आणि अर्चना नेवरेकर सख्ख्या बहिणी आहेत. सुप्रिया पठारे यांनीही कमी वयातच कामाला सुरुवात केली होती. दोघी बहिणींचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांच्या पसंतीस पडतात.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटी