Join us

कोणताही गाजावाजा न करता हा मराठी अभिनेता करतोय लोकांना मदत, सोशल मीडियाद्वारे लोक मानतायेत आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 15:12 IST

हा अभिनेता अनेक गरजूंना दैनंदिन जीवनातील आवश्यक असणाऱ्या वस्तूंचे वाटप करत आहे.

ठळक मुद्देसुशांत शेलार अखिल भारतीय चित्रपट महामंडळाद्वारे अनेक गरजू कलावंताना मदत करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत.

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले असून आता भारतातही कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला आहे. या व्हायरसमुळे भारतात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. तसेच भारतात लॉकडाऊन असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे अनेक बॉलिवूड सेलिब्रेटी, बिझनेसमन, राजकारणी पुढे येऊन गरजूंना मदत करत आहेत. बॉलिवूडच्या कलाकारांचे सगळेच यामुळे कौतुक करत आहेत. पण या सगळ्यात एक मराठी अभिनेता देखील कोणताही गाजावाजा न करता लोकांना मदत करत आहे.

सुशांत शेलार अखिल भारतीय चित्रपट महामंडळाद्वारे अनेक गरजू कलावंताना मदत करत आहे. गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. त्याद्वारे लोक सुशांत शेलारचे आभार मानताना दिसत आहेत. सुशांतने अनेक गरजूंना दैनंदिन जीवनात लागणाऱ्या वस्तूंचे वाटप केले आहे. त्यामुळे सोशल मीडियाद्वारे अनेकजण त्याचे आभार मानत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी त्याने भांडुपमध्ये राहाणाऱ्या २२ नृत्यकलाकारांना मदत केली होती. 

सुशांत शेलारचे केवळ सामान्य लोकच नव्हे तर चित्रपटसृष्टीतील कलाकार देखील कौतुक करत आहेत. अभिनेता श्रेयस तळपदेने काही दिवसांपूर्वी एक ट्वीट केले होते आणि त्यात लिहिले होते की, मी सुशांत शेलारला अनेक वर्षांपासुन ओळखतो. तो केवळ एक खूप चांगला अभिनेताच नव्हे तर एक खूप चांगला माणूस देखील आहे. तो नेहमीच लोकांना मदत करण्यासाठी तत्पर असतो. त्याला खरे तर रॉबिनहुड शेलार अशीच हाक मारली पाहिजे असे मला वाटते. तू अशाच प्रकारची मदत यापुढे करत राहा...  

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या