Join us  

मृण्मयीचा अभिनय पाहून भारावून गेले होते सुनील बर्वे; बक्षीस म्हणून दिले होते पाकिटातील सगळे पैसे

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2024 1:26 PM

Mrunmayee deshpande: 'स्वरगंधर्व सुधीर फडके' या सिनेमाच्या निमित्ताने सुनील बर्वे आणि मृण्मयी देशपांडे यांनी जोडीने तब्बल १५ वर्षानंतर एकत्र स्क्रीन शेअर केली आहे.

महाराष्ट्र दिनानिमित्त नुकताच स्वरगंधर्व सुधीर फडके हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला. विशेष म्हणजे पहिल्या दिवसापासून हा सिनेमा लोकप्रिय ठरत आहे. त्यामुळे त्यातील प्रत्येक कलाकार सध्या सोशल मीडियावर चर्चेत येत आहे. यामध्येच अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिची एक मुलाखत चर्चेत आली आहे. या मुलाखतीमध्ये तिने अभिनेता सुनील बर्वे यांचा एक अविस्मरणीय किस्सा सांगितला आहे.

'स्वरगंधर्व सुधीर फडके' या सिनेमात सुनील बर्वे यांनी बाबूजींची भूमिका साकारली आहे. तर, मृण्मयीने बाबूजींच्या पत्नीची ललिताबाईंची भूमिका वठवली आहे. विशेष म्हणजे तब्बल १५ वर्षानंतर या जोडीने एकत्र स्क्रीन शेअर केली आहे. यापूर्वी ही जोडी कुंकू या मालिकेत झळकली होती. याच मालिकेचा एक किस्सा मृण्मयीने सांगितला आहे.

अलिकडेच मृण्मयीने 'राजश्री मराठी'ला मुलाखत दिली. यावेळी तिने कुंकू मालिकेच्या सेटवर घडलेला किस्सा सांगितला. सुनील बर्वे यांनी चक्क मृण्मयीला त्यांच्या पाकिटात होते तितके सगळे पैसे दिले होते. इतकंच नाही तर तिचं कौतुकही केलं होतं.

“कुंकूचं शुटींग सुरू होतं. एक सीन सुरू होता. मास्टर झाला, क्लोज झाला. सुनील दादाचा क्लोज सीन झाला. मग माझा सीन सुरू होता. बोलता बोलता जानकीच्या डोळ्यात पाणी येत असा काहीसा तो सीन होता. मी ती वाक्य बोलले आणि बोलतानाच मला काही सेकंद सुनील दादाच्या डोळ्यातले भाव दिसले. तेव्हा तो तिथे नरसिंह म्हणून रिअॅक्ट झाला नाही. तर, त्याच्या डोळ्यात माझ्यासाठी खूप कौतुक दिसलं. सीन कट झाला आणि काहीही न बोलता त्याने सगळ्यांसमोर माझा हात धरुन मला मेकअप रुपमध्ये घेऊन गेला. मला काहीच कळेना काय झालंय ते,”, असं मृण्मयी म्हणाली.

पुढे ती म्हणते, “संपूर्ण सेटसमोर तो मला घेऊन गेला होता. त्यानंतर त्याने मेकअप रूममध्ये त्याचं पाकिट उघडलं. त्याच्या पाकिटात त्या दिवशी जेवढे पैसे होते ते सगळे त्याने माझ्या हातावर ठेवले आणि तो म्हणाला की, 'तू जे आता केलंस ना बाळा ते जप. तुझं कौतुक करण्यासाठी माझ्याकडे आता शब्द नाही. आता माझ्याकडे जेवढे पैसे आहेत ते तुझे. आता माझ्याकडे 2 कोटी रुपये असते तरी मी ते तुला दिले असते. त्यानंतर मी खूप भारावून गेले. मी खूप खुश झाले होते. हा क्षण माझ्यासाठी एक बेंचमार्क झाला”.

टॅग्स :मृण्मयी देशपांडेसुनील बर्वेसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन