Sameer Dharmadhikari: मुंबईसह देशभरात वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या वाहतूक कोंडीला प्रत्येकजण वैतागला आहे. सध्या मुंबईत रस्ते तसेच मेट्रोची कामं जोरात सुरु आहेत. त्यामुळे शहरांमधील वाहतूक कोंडी आणखी वाढते आहे. सर्वसामान्यांसह अनेक सेलिब्रिटी देखील या मुद्द्यावर आपलं मत मांडताना दिसतात. अशातच लोकप्रिय मराठी अभिनेता समीर धर्माधिकारीने मुंबईच्या वाहतूक कोंडींच्या समस्येवर भाष्य केलं आहे.
नुकताच समीर धर्मधिकारीने मंदार जोशी यांच्या 'तारांगण' ला मुलाखत दिली.त्यादरम्यान, अभिनेत्याने मुंबई शहराची ट्रॅफिकच्या समस्येतून सुटका होण्यासाठी अजब तोडगा सांगितला आहे. यावेळी तो म्हणाला, "मला वाटतं की जे रिटायरमेंटला आलेत त्यांनी आपापल्या गावी जावं आणि नवीन जे टॅलेंट येतंय त्यांना मुंबईत जागा करून द्यावी म्हणजे ट्रॅफिक कमी होईल!हे खरंच बेसिक आहे . कारण रस्ते वाढलेत पण गाड्या त्याच्यापेक्षा जास्त पटीने वाढल्यात. बेशिस्त आडव्या तिडव्या कुठूनही गाड्या घालतात. मला हे मनापासून वाटतं की जे रिटायरमेंटला आलेत ना त्यांनी खरंच गावी जाऊन शांत जीवन जगावं कारण सगळेच मुंबईत कुठून ना कुठून तरी आलेले आहेत".
त्यानंतर अभिनेता म्हणाला, "लोकांनी पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर करावा. अप्रतिम मेट्रो वगैरे आल्या आहेत. लोकल तर सगळ्यांची जीवनवाहिनी आहे. प्रत्येकाने आपल्याकडे एक गाडी असावी, असा अट्टाहास करू नये. मला वाटतं पब्लिक ट्रान्सपोर्टचा वापर केला तर ही ट्रॅफिकची समस्या निर्माण होणारच नाही." असं म्हणत अभिनेत्याने त्याचं मत व्यक्त केलं आहे.
दरम्यान, अभिनेता समीर धर्माधिकारीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर त्याने 'वजन दार', 'बॉईज ३', 'लालबाग परळ', 'शेर शिवराज' यांसारख्या मराठी आणि 'सिंघम रिटर्न्स', 'मुंबई मेरी जान', 'सत्ता' यांसारख्या हिंदी चित्रपटात तो झळकला आहे. त्याचबरोबर अनेक मालिंकामध्येही त्याने काम केलं आहे. आपल्या गुड लूक्सच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारा समीर हा हिंदीमध्ये जास्त रमला.