Join us  

अल्लू अर्जुनचा बहुचर्चित सिनेमा 'पुष्पा'मध्ये या मराठमोळ्या अभिनेत्याची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 08, 2021 2:07 PM

'पुष्पा' चित्रपटात हा मराठमोळा अभिनेता महत्त्वाची भूमिका बजावताना दिसणार आहे.

साउथ इंडस्ट्रीचा सुपरस्टार अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट पुष्पा द राईज येत्या १७ डिसेंबरला रिलीज होतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची वाट पाहत आहेत. या चित्रपटात अल्लू अर्जुनसोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहे. पुष्पा हा तेलुगू चित्रपट सुकुमार बनरेड्डी यांनी दिग्दर्शित केला आहे. चंदन तस्कर विरप्पन यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित असल्याचे म्हटले जात आहे. दरम्यान आता असे समजते आहे की, या चित्रपटात एका मराठी अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हा अभिनेता म्हणजे श्रेयस तळपदे. 

पुष्पा या चित्रपटात अल्लू अर्जुन या चित्रपटात दुहेरी भूमिका निभावताना दिसणार आहे. सुरुवातीला जंगलात चंदनाची तस्करी करणारा खलनायकाच्या भूमिकेत तसेच नायकाच्या भूमिकेतही तो दिसणार आहे. एक्शन थ्रिलरने भरलेला हा चित्रपट सुपरहिट ठरणार अशी चर्चा आहे. चित्रपटातील सामी सामी हे गायिका सेंथिल गणेश राजलक्ष्मी यांच्या आवाजातील गाणे रिलीज अगोदरच सुपरहिट झाले आहे. अभिनेता श्रेयस तळपदेची या चित्रपटात वर्णी लागली आहे. मात्र तो या चित्रपटात अभिनय करताना दिसणार नाही. पण या चित्रपटाचा तो महत्वाचा भाग बनला आहे.

पुष्पा या चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये अल्लू अर्जुनच्या भूमिकेला श्रेयसने आपल्या आवाजात डब केले आहे. त्यामुळे श्रेयस या चित्रपटासाठी खूपच उत्सुक असलेला पाहायला मिळतो आहे. याअगोदर श्रेयसने ‘द लॉयन किंग’ चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये सिम्बाचा बेस्ट फ्रेंड टीमॉनच्या पात्राला आपला आवाज दिला होता. आता प्रथमच तो तेलुगू चित्रपटासाठी आणि तेही नायकाच्या मुख्य पात्राला आपला आवाज देणार आहे.

टॅग्स :श्रेयस तळपदेअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना