हृदयांतर चित्रपटाद्वारे मनिष पॉलचे मराठीत पदार्पण
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2016 16:03 IST
मनिष पॉलने छोट्या पडद्यावरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. राधा की बेटीया कुछ कर दिखायेगी या मालिकेत तो झळकला होता. ...
हृदयांतर चित्रपटाद्वारे मनिष पॉलचे मराठीत पदार्पण
मनिष पॉलने छोट्या पडद्यावरून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. राधा की बेटीया कुछ कर दिखायेगी या मालिकेत तो झळकला होता. त्यानंतर डान्स इंडिया डान्स, झलक दिखला जा यांसारख्या कार्यक्रमात त्याने केलेले सूत्रसंचालन प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. छोट्या पडद्यावर त्याच्या कामाचे कौतुक झाल्यानंतर त्याला मोठ्या पडद्यावरच्या अनेक ऑफर्स मिळायला लागल्या. तीस मार खान, एनी बडी कॅन डान्स यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली आहे आणि त्यानंतर तो मिकी व्हारस, तेरे बिन लादेन 2 या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिकेत झळकला. आता तो मराठी चित्रपटामध्ये काम करणार आहे.विक्रम फडणीस यांच्या हृदयांतर या चित्रपटाचा मुहर्त नुकताच झाला. या चित्रपटात मनिष एका पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तो मनिष पॉल हीच व्यक्तिरेखा साकारणार आहे. मनिष आणि विक्रम अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. मनिषने आपल्या या मित्राच्या चित्रपटाचे नुकतेच चित्रीकरण केले. या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी मनिष सांगतो, "मला विक्रमने हृद्यांतरची कथा ऐकवल्यानंतर मला ती खूप आवडली होती. या चित्रपटात तुला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत झळकायला आवडेल का असे मला विक्रमने विचारले आणि मी लगेचच या चित्रपटासाठी होकार दिला. विक्रमच्या चित्रपटाचा मी हिस्सा बनलो याचा मला खूप आनंद झाला आहे. माझे या चित्रपटातील दृश्य हे लहान मुलांसोबतचे आहे. एका शाळेच्या खेळ महोत्सवात मी एक सेलिब्रेटी म्हणून येतो असे तुम्हाला पाहायला मिळणार आहे. लहान मुलांसोबत काम करताना मला खूपच मजा आली."हृद्यांतर या चित्रपटामध्ये सुबोध भावे आणि मुक्ता बर्वे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.