सोशल मीडियावरील गाण्यांचा ट्रेंड हा रोज बदलताना दिसतो. काही दिवसांपासून 'एक नंबर तुझी कंबर' गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. आता "मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..." या गाण्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वैभव जोशींची ही कविता सध्या सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. या कवितेच्या ओळींनी चाहत्यांना वेड लावलं आहे. यावरील अनेक रीलही आता बनू लागले आहेत.
वैभव जोशींची "मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..." ही कविता आणि त्याचं संगीत इतकं मधुर आणि श्रवणीय आहे की ते ऐकून कोणीही सहज या गाण्याच्या प्रेमात पडेल. एकदा हे गाण ऐकलं की ऐकतंच राहावं असं वाटतं. त्यामुळेच या गाण्यावर रील करण्याचा मोहही आवरता येत नाहीये. मराठी कलाकारांनीही या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे.
पुष्कर क्षोत्री, आनंद इंगळे आणि सुनील बर्वे या रीलमध्ये दिसत आहेत. एअरपोर्टवरच कलाकारांनी हा रील बनवला आहे. विशेष म्हणजे या रीलमध्ये खुद्द वैभव जोशीदेखील आहेत. पुष्कर क्षोत्रीने त्याच्या अकाऊंटवरुन हा रील शेअर केला आहे. मराठी कलाकारांनी बनवलेला रील व्हिडीओ चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. या व्हिडिओवर सेलिब्रिटींनी कमेंट केल्या आहेत.