मराठी तसेच हिंदी सिनेमांमध्ये दिसणारे अभिनेते मकरंद देशपांडे (Makrand Deshpande) यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या विरोधात काल रविवारी मुंबईत निदर्शन केलं. यासोबतच त्यांनी मृत्यू पावलेल्या निष्पाप पर्यटकांप्रती श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी आपण सरकारसोबत असलं पाहिजे असंही ते यावेळी म्हणाले. या विरोध प्रदर्शनात त्यांच्यासोबत अनेक लोक सहभागी झाले होते. मकरंद देशपांडेंनी यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.
मुंबईतील शिवाजी पार्क परिसरात काल मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा काढण्यात आली. तसंच या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. प्रत्येकाच्या हातात पाट्या होत्या ज्यावर निषेध व्यक्त करणारा संदेश लिहिला होता. अभिनेते मकरंद देशपांडेही या यात्रेत सहभागी होते. एएनआयला दिलेल्या मुलाखतीत ते म्हणाले, "निष्पाप लोक मारले गेले त्यांच्यासाठी ही श्रद्धांजली यात्रा होती. तसंच दहशतवादी हल्ल्याचा निषेध व्यक्त करायचा होता. धर्म,नाव विचारुन मारलं असं ऐकण्यात येत आहे जे खूप चुकीचं आहे. केंद्र सरकार जे करेल त्यांच्यासोबत आपण असलं पाहिजे. स्वत:च निर्णय घेऊ नका, सरकार जो निर्णय घेईल त्यासोबत राहा."
हल्ल्याविरोधात करण्यात आलेल्या या प्रदर्शनात लोकांनी संताप व्यक्त केला. 'एकजूट होऊन आम्ही हातात हात घालून उभे आहोत','एक देश एक धडकन', 'भारत माँ की पुकार, सब एक हो जाएँ इस बार' अशा प्रकारचे संदेश लिहिलेल्या पाट्या घेऊन लोकांनी हे निदर्शन केलं.
अतुल कुलकर्णीचा काश्मीर दौरा
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. धर्म विचारुन त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. सर्व पुरुष पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं. यानंतर काश्मीरमध्ये भीतीचं वातावरण आहे. पर्यटकांनी आता काश्मीरकडे पाठ फिरवल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे अभिनेता अतुल कुलकर्णीने काश्मीर दौरा करत एकजुट होण्याचं आणि काश्मीरसोबत राहण्याचं आवाहन केलं आहे.