Join us  

‘सडकी’ शेरेबाजी करणाऱ्यांनो...., मांजरेकरांवर टीका करणाऱ्यांवर अमेय खोपकर भडकले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 4:37 PM

दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha ) हा सिनेमा वादात सापडला आहे. या प्रकरणावर मनसेचे अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांचीही प्रतिक्रिया आली आहे. 

दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar) यांचा ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ (Nay Varan Bhat Loncha Kon Nay Koncha ) हा सिनेमा वादात सापडला आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि यातील काही बोल्ड सीनमुळे चित्रपट वादात अडकला. ट्रेलरमधील आक्षेपार्ह दृश्यांवर महिला आयोगानेही आक्षेप घेतला. हा वाद चिघळण्याआधीच, काल मांजरेकर यांनी  चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्यं वगळणार असल्याचं जाहीर केलं. अशात आता या प्रकरणावर  मनसेचे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) उपाध्यक्ष तसेच महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कामगार सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (Ameya Khopkar) यांचीही प्रतिक्रिया आली आहे. 

अमेय यांनी फेसबुकवर पोस्ट लिहून या सिनेमाच्या निमित्ताने मांजरेकरांवर टीका करणाऱ्यांवर संताप व्यक्त केला.

‘नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा या मराठी चित्रपटावरुन जो वाद सुरु आहे, त्यात महेश मांजरेकर यांच्यावर वैयक्तिक स्वरुपाची अश्लाघ्य टीका करणाऱ्यांचा मी अग्रक्रमाने निषेध करतो. महेश मांजरेकर हे मराठी चित्रपटसृष्टीचे आधारस्तंभ आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या  नाय वरणभात लोन्चा, कोण नाय कोन्चा  या चित्रपटाबद्दल जे काही बोलायचं असेल ते चित्रपट बघून ठरवा. पूर्वग्रहदूषित  सडकी  शेरेबाजी करणाऱ्यांनो, आपला मेंदू किती सडलेला आहे हेच तुम्ही जगाला ओरडून सांगताय. मी चित्रपट बघून लवकरच पुन्हा बोलेनच,या शब्दांत खोपकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

महेश मांजरेकर यांची प्रतिक्रिया ‘नाय वरनभात लोन्चा, कोन नाय कोन्चा’ या चित्रपटासंदर्भातील वादावर काल महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली होती. ‘ प्रोमेमधील काही दृष्यांवर समाजातील काही घटकांनी आक्षेप घेतला असला तरी कोणाच्याही भावना दुखवण्याचा आमचा हेतू नव्हता. समाजातून उमटणा-या भावनांचा मान राखत आम्ही या चित्रपटाच्या प्रोमोमधून आक्षेपार्ह वाटणारी सर्व दृष्ये काढून टाकली आहे. तसेच हा प्रोमो सर्व ठिकाणांवरून काढण्यात आला असून सुधारित प्रोमो सर्वांना पाठवण्यात आला आहे, असं त्यांनी काल स्पष्ट केलं. आक्षेपार्ह दृष्ये ही केवळ प्रोमोमधूनच नाही तर चित्रपटामधून देखील वगळण्यात आल्याचं महेश मांजरेकरांनी सांगितलं आहे.  

टॅग्स :महेश मांजरेकर