Join us
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीकांत बेर्डे यांचे फॅन असाल तर नक्कीच पाहा त्यांचा हा फोटो, सोबत आहे प्रिया आणि चिमुकला अभिनय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 15:33 IST

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देलक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या.

लक्ष्मीकांत बेर्डे यांचा एक जुना फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आपल्याला या फोटोमध्ये त्यांच्यासोबत त्यांची पत्नी प्रिया बेर्डे, आणि मुलगा अभिनय यांना पाहायला मिळत आहे. या फोटोत अभिनय खूपच छोटा दिसत आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांचा हा फोटो त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत आहे.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी सिनेमाच्या या रंगीत दुनियेत पाऊल ठेवल्यानंतर मराठी सिनेमाच नाहीतर नाटक आणि हिंदी सिनेमातूनही स्वत:चा असा वेगळा ठसा उमटवत अनेक भूमिका अजरामर केल्या. कॉमेडीचं भन्नाट टायमिंग आणि कसदार अभिनयाच्या जोरावर लक्ष्मीकांत बेर्डेंनी अभिनेता म्हणून ओळख निर्माण केली. करिअरमध्ये कितीही चढउतार आले तरी ते डगमगला नाहीत आणि अवघं जगं जिंकून घेतल्याप्रमाणे साऱ्यांचा ‘लाडका लक्ष्या’ म्हणून त्यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान प्राप्त केलं.

मराठीत यशाच्या सर्वोच्च शिखरावर असताना हिंदी चित्रपटातही लक्ष्मीकांत यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून दिली. ‘राजश्री प्रॉडक्शन’च्या ‘मैने प्यार किया’ या चित्रपटात सलमान खानच्या मित्राची भूमिका त्यांनी छान निभावली. तसेच हम आपके है कोनमध्ये देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली होती. मराठीत ‘एक होता विदूषक’ गंभीर नाटकातील भूमिकेने लक्ष्मीकांत यांच्या अभिनयक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले.

लक्ष्मीकांत यांनी विनोदी भूमिका जितक्या सहजतेनं आणि लीलया निभावल्या तितक्याच निष्ठेनं अनेक गंभीर भूमिकांनाही त्यांनी शंभर टक्के न्याय दिला. मात्र अभिनयाची अष्टपैलू ओळख निर्माण करणाऱ्या अशा गंभीर भूमिका त्यांच्या वाट्याला फार कमी आल्या.

असा हा चतुरस्त्र आणि विनोदाचा बादशहा असलेला कलाकार चाहत्यांना अखेर पर्यंत हसवत राहिला. किडणीसारख्या महाभयंकर आजाराची चाहूल कुणालाही लागू न देता साऱ्यांच्या लाडक्या लक्ष्मीकांत यांनी १६ डिसेंबर २००४ ला जगाचा निरोप घेतला. मात्र त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रत्येक रसिकाच्या मनात आजही ठसठशीतपणे कोरल्या गेल्यात. त्यामुळे त्यांना विसरणं कुणालाही शक्य नाही.

टॅग्स :लक्ष्मीकांत बेर्डे