कलाकार मंडळी अभिनयासह इतर गोष्टींमध्येही तितकेच पारंगत असतात. वैयक्तिक आयुष्यात अभिनयासह निरनिराळ्या गोष्टी करणं कलाकारांना आवडतं. शुटिंगच्या रोजच्या बिझी शेड्युअलमध्ये स्वतःसाठी वेळ घालवत कलाकार त्या क्षणाचा आनंद घेत असतात. प्रत्येक कलाकाराला जीवनात काही ना काही छंद असतो. कुणाला जेवण बनवणं, कुणाला गायनाचा तर कुणाला फिरण्याचा छंद असतो. त्याच फिरण्याच्या छंदासह निसर्ग सौंदर्याचा कलाकार आनंद घेतात. असाच फिरण्याचा छंद मराठमोळी अभिनेत्री अदिती सारंगधरलाही आहे. अदितीने तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोत अदितीचा स्पोर्टी आणि रफ अँड टफ लूक पाहायला मिळतो आहे. अदितीचा हा फोटो निसर्ग सौंदर्याने नटलेल्या माथेरान परिसरातील आहे. हातात काठी, स्पोर्ट्स ट्रॅकसूट, स्पोर्ट्स शूज आणि पाठीवर बॅग असा अदितीचा अंदाज या फोटोत पाहायला मिळत आहे. या फोटोवरुन ट्रेकिंगचा मनमुराद आनंद अदितीने घेतल्याचे दिसत आहे. अदितीने या फोटोसह पोस्टही शेअर केली आहे. निसर्गासह पहिली डेट असं तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे. शिवाय ट्रेकिंगचा पहिला अनुभव अदितीसाठी सुखद ठरल्याचं या पोस्टमधून समजतंय. अदिती सारंगधरने मराठी सिनेमा, छोटा पडदा आणि रंगभूमीवर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'दामिनी', 'वादळवाट', 'लक्ष्य' या मालिकांमधून ती घराघरांत पोहोचली आहे. तसंच नवरा माझा भवरा, उलाढाल, ऐक, जस्ट गंमत, नाथा पुरे आता अशा सिनेमात अदितीने लक्षवेधी भूमिका साकारल्या आहेत. लिटमस,ग्रेसफुल, प्रपोजल अशा नाटकांमधून अदितीने रंगभूमीवरही आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. मात्र अभिनय कौशल्यासह ट्रेकिंगही अदिती तितकंच एन्जॉय करत असल्याचे या निमित्ताने समोर आले आहे.