Join us  

विनाहेल्मेट आणि पोलीस टॅग लावून दुचाकी चालवणाऱ्यांची पोलखोल, केदार शिंदेंकडून ट्विटरवर फोटो पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 2:59 PM

अनेकजण हेल्मेटविना दुचाकी चालवतात. असाच एक दुचाकीस्वार केदार यांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला.

कितीही नियम किंवा कायदे केले तरी ते मोडण्यातच आपल्यापैकी अनेकजण धन्यता मानतात. अनेक वाहनचालक तर जणू नियम मोडणं आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे अशा आविर्भावात वावरतात. अशाच एका वाहतूक नियम मोडणाऱ्या दुचाकीस्वाराची पोलखोल दिग्दर्शक केदार शिंदे यांनी केली आहे. अपघात झाल्यास डोकं शाबूत राहावं किंवा डोक्याला इजा होऊ नये यासाठी हेल्मेट सक्ती करण्यात आली आहे. मात्र अनेकजण हेल्मेटविना दुचाकी चालवतात. असाच एक दुचाकीस्वार केदार यांनी कॅमेऱ्यात कैद केला आणि ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला. विक्रोळी भांडुप परिसरात पूर्व द्रुतगती मार्गावर हे दुचाकीस्वार विनाहेल्मेट दुचाकी चालवतायत. इतकंच नाहीतर मोठ्या अभिमानाने त्यांच्या दुचाकीवर पोलीस टॅगही लावला आहे. मुंबई पोलीस काही तरी करा अशी आर्जव केदार यांनी ट्विटद्वारे केली आहे. 

 

दिग्दर्शक केदार शिंदे ट्विटरवर सक्रीय असून ते आपल्या भावना, विचार चाहत्यांसोबत शेअर करत असतात. 'अगं बाई अरेच्चा', 'जत्रा', 'यंदा कर्तव्य आहे', 'गलगले निघाले', 'बकुळा नामदेव घोटाळे', 'इरादा पक्का' अशा विविध मराठी सिनेमातून दिग्दर्शक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. याशिवाय रंगभूमीवरही केदार यांनी दर्जेदार नाटकं दिली आहेत. यात 'सही रे सही', 'लोचा झाला रे', 'श्रीमंत दामोदरपंत'' अशा अनेक नाटकांचा उल्लेख करता येईल. याशिवाय 'हसा चकट फू', 'श्रीयुत गंगाधर टिपरे', 'घडलंय बिघडलंय' या मालिकांमधून त्यांनी छोट्या पडद्यावरही ओळख निर्माण केली आहे.

टॅग्स :केदार शिंदे