Join us

​कल्याण फिल्म फेस्टीव्हलमध्ये 'कट्यार'ची बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2017 15:33 IST

बेस्ट ज्युरी अवॉर्डसह तब्बल ६ पुरस्कार मिळवत 'कट्यार काळजात घुसली' या सुपरहिट मराठी चित्रपटाने कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये ...

बेस्ट ज्युरी अवॉर्डसह तब्बल ६ पुरस्कार मिळवत 'कट्यार काळजात घुसली' या सुपरहिट मराठी चित्रपटाने कल्याण इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल मध्ये बाजी मारली. गेले ५ दिवस विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी सादर करून कल्याणकरांना भुरळ घातलेल्या या फिल्म फेस्टीव्हलचा नयनरम्य पुरस्कार सोहळ्याद्वारे समारोप झाला.यामध्ये ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांना कार्यगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तर मिलिंद गवळी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि क्रांती रेडकरने सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळवला.दिवंगत अभिनेत्री सुलभा देशपांडे आणि अश्विनी एकबोटे यांना आदरांजली वाहून या पुरस्कार सोहळ्याला आरंभ करण्यात आला. गेल्या ५ दिवसात या फिल्म फेस्टीव्हलमध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटांसाठी ही पुरस्कार संध्या आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये यावर्षी मराठीत सुपरहिट ठरलेल्या 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाने ६ पुरस्कार मिळवत आजही आपली मोहिनी कायम असल्याचे सिद्ध केले. या पुरस्काराने बेस्ट फिल्म ज्युरी अवॉर्डसह सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुबोध भावे, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - शंकर महादेवन, सर्वोत्कृष्ट गीतकार - मंदार चोळकर, सर्वोत्कृष्ट सांगितिक चित्रपट, सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक - संतोष फुटाणे, सर्वोत्कृष्ट संवाद - प्रकाश कपाडिया अशा पाच महत्वाच्या पुरस्कारांवर आपले नाव कोरले. त्याचबरोबर कचरावेचक मुलांच्या जीवनावर आधारित हाफतिकीट चित्रपटानेही ४ पुरस्कार मिळवत आपली पताका फडकवली. एकीकडे पुरस्कार आणि दुसरीकडे रंगारंग नृत्य-सांगितिक कार्यक्रमामुळे या समारोप सोहळ्यामध्ये आणखीनच रंगत आणली. नृत्य दिग्दर्शक संदेश पाटील यांनीही त्यात मोलाचा वाटा उचलला. सुप्रसिद्ध कलाकार आशिष पाटील, भार्गवी चिरमुले, सिया पाटील, मनीषा केळकर यांच्या अप्रतिम नृत्य अदाकारीबरोबरच ज्ञानेश्वर मेश्राम यांच्या अभंग आणि भक्तिगीतांनी फिल्म फेस्टीव्हलचे वातावरण एकदम भक्तीमय करून टाकले. तर सुप्रसिद्ध ज्येष्ठ विनोदी अभिनेते विजय कदम यांनी सादर केलेल्या कॉमेडी स्कीटने उपस्थितांना खळखळून हसवले. आयोजक संदीप गायकर आणि दिग्दर्शक विनोद शिंदे यांनी या अतिशय देखण्या आणि भव्य-दिव्यतेने हा फिल्म फेस्टीव्हल आयोजित करून रसिक प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. या समारोप सोहळ्याला मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील अनेक दिग्गज दिग्दर्शक, निर्माते, तंत्रज्ञ, कलाकार यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्यांनी या फिल्म फेस्टीव्हलचे भरभरून कौतूक केले. येत्या जानेवारी महिन्यात 'फक्त मराठी' वाहिनीवर या सोहळ्याचे प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहिती या वाहिनीचे बिझनेस हेड श्याम मळेकर यांनी दिली.हे ठरले पुरस्काराचे मानकरी... सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक - सुबोध भावे, (कट्यार काळजात घुसली)बेस्ट फिल्म ज्युरी अवॉर्ड - कट्यार काळजात घुसलीसर्वोत्कृष्ट अभिनेता - मिलिंद गवळी, (हक्क)सर्वोत्कृष्ट अभिनेत्री - क्रांती रेडकर, (किरण कुलकर्णी वर्सेस किरण कुलकर्णी)सर्वोत्कृष्ट बाल कलाकार - शुभम मोरे, विनायक पोतदार (हाफ तिकीट)सर्वोत्कृष्ट सामाजिक आशय चित्रपट - (हक्क)सर्वोत्कृष्ट प्रादेशिक चित्रपट - बियाबान, द कर्स बाय वुमनसर्वोत्कृष्ट बालचित्रपट- हाफ तिकीट सर्वोत्कृष्ट चित्रपट ज्युरी पुरस्कार - अण्णासर्वोत्कृष्ट ग्रामीण चित्रपट - काली चाटसर्वोत्कृष्ट सांगितिक चित्रपट - कट्यार काळजात घुसलीसर्वोत्कृष्ट गीतकार - मंदार चोळकर, (कट्यार काळजात घूसली)सर्वोत्कृष्ट संगीतकार - मिलिंद मोरे, (चाहतोमी तुला)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक - शंकर महादेवन , (कट्यार काळजात घुसली)सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका - आनंदी जोशी, (चाहतो मी तुला)सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक - संतोष फुटाणे, (कट्यार काळजात घुसली)सर्वोत्कृष्ट एडिटर - फैजल आणि इम्रान ( हाफ तिकीट)सर्वोत्कृष्ट छायांकन - संजय नेमाणे , हाफ तिकीटसर्वोत्कृष्ट कथा - डॉ. सुनिल चतुर्वेदी, (काली चाट)सर्वोत्कृष्ट पटकथा - रेखा त्रिलोक्य, (अथांग) सर्वोत्कृष्ट संवाद - प्रकाश कपाडिया, (कट्यार काळजात घुसली)