Join us  

सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लावणे चुकीचे: रेणुका शहाणे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2017 12:32 PM

कंडोमला जीएसटीमधून मुक्त करण्यात आले आहे. पण सॅनिटरी नॅपकिनवर 12 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लावणे ...

कंडोमला जीएसटीमधून मुक्त करण्यात आले आहे. पण सॅनिटरी नॅपकिनवर 12 टक्के जीएसटी लावण्यात आला आहे. सॅनिटरी नॅपकिनवर जीएसटी लावणे हे चुकीचे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. सेलिब्रेटींचे याबाबत काय मत आहे हे जाणून घेऊया... पल्लवी जोशी  : जीएसटीमधून कंडोम वगळण्याचा निर्णय चांगला आहे. कंडोमचा वापर करण्यासाठी जनजागृती केली पाहिजे. जगातील नेतेमंडळी एचआयव्ही पॉझिटिव्हच्या यादीत यावेत असे आम्हाला वाटत नाही. याचबरोबर, आपण सॅनिटरी नॅपकिनचा वापर करण्यासाठी महिलांना शिक्षण देण्याची गरज आहे. सॅनिटरी नॅपकिनचा वापर न करता अस्वच्छ कपड्यांच्या वापरामुळे ग्रामीण भागातील महिलांना गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे माझ्यामते, सॅनिटरी नॅपकिनमध्ये सूट दिली पाहिजे.मयुरी वाघ ः जीएसटीची ज्यावेळी घोषणा करण्यात आली होती. त्याचवेळी मी ट्वीट करून या गोष्टीचा विरोध केला होता. माझ्या प्रमाणे अनेक सेलिब्रेटींनी विरोध करूनही काहीही झाले नाही. कंडोम जीएसटीमुक्त असणे यात मला काहीही चुकीचे वाटत नाही. एचआयव्हीचा प्रसार होऊ नये यासाठी हे गरजेचे आहे. पण सॅनिटरी नॅपकिनवरही कर लावला जाऊ नये. कारण ही गोष्ट महिलांच्या आरोग्यासाठी अतिशय गरजेची आहे. सॅनिटरी नॅपकिन महाग असल्याने अनेक महिलांना ते घेणे परवडत नाही आणि त्यात आता जीएसटीची भर पडल्याने कमी उत्पन्न असलेल्या स्त्रियांसाठी तर ते कठीणच आहे. नॅपकिन ही प्रत्येक स्त्रीला दर महिन्याला लागणारी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे यावर लावलेल्या जीएसटीच्या विरोधात येऊन सगळ्या महिलांनी आवाज उठवणे गरजेचे आहे.सई ताम्हणकर : सॅनिटरी नॅपकिनवर इतका जीएसटी लावणे ही एक लज्जास्पद गोष्ट आहे असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. मासिक पाळीच्या वेळी प्रत्येक स्त्रीला सॅनिटरी नॅपकिनची गरज असते. एक स्त्री असण्याचा आपल्याला हा कर द्यावा लागतोय का हाच प्रश्न मला आता पडलेला आहे.रेणुका शहाणेः कंडोमवर कर लावणे यात मला चुकीचे वाटत नाही. कारण यामुळे एचआयव्हीचा प्रादुर्भाव होत नाही. तसेच यामुळे लोकसंख्या नियंत्रणात राहाण्यास मदत होते. पण मासिक पाळी ही एक प्राकृतिक गोष्ट असून ती निसर्गाशी निवडित आहे. पूर्वीच्या काळात अनेक स्त्रिया या कपड्यांचा वापर करत असत. पण गेल्या काही वर्षांपासून सॅनिटरी नॅपकिन वापरण्याकडे महिलांचा कल दिसून येतोय. पण याच्या किंमती वाढल्यास गरिबांना ते परवडणार नाहीये. त्या स्त्रिया पुन्हा कपड्यांकडे वळतील याचा त्यांच्या आरोग्यावर नक्कीच परिणाम होईल. मासिक पाळीमुळे ग्रामीण भागात अनेक मुली शाळा देखील सोडतात. त्यामुळे सॅनिटरी नॅपकिन कमीत कमी किमतीत सामान्य स्त्रीपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे असे मला वाटते.