मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण कारळे (Pravin Karale) यांचे आज (ता. २३ जून) निधन झाले. सकाळी दहा वाजता पुण्यात मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. प्रसिद्ध नाट्य आणि चित्रपट समीक्षक राजा कारळे हे त्यांचे वडील होते. त्यांच्या पश्तात्य पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
वयाच्या चौथ्या वर्षांपासूनच प्रवीण यांनी नाटकातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते. कॉलेजमध्ये असताना एकांकिका, नाट्य स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. बालनाट्यांचे दिग्दर्शन ते अगदी लघुपट आणि चित्रपटाच्या दिग्दर्शनापर्यंत त्यांनी मजल मारली होती. बोकड, भैरू पैलवान की जय, माझी आशिकी, दुनिया गेली तेल लावत, हृदयात समथिंग समथिंग हे चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले होते. स्वातंत्र्यवीर या त्यांच्या वेबसिरीजचेही कौतुक झाले होते.मराठी सिनेइंडस्ट्रीसोबतच त्यांनी बॉलिवूडमध्येही काम केले होते. महेश भट यांच्याकडे असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम केले. प्रवीण कारळे यांच्या निधनानंतर मराठी कला विश्वातून हळहळ व्यक्त केली जात आहे.