Join us  

बायोपिक साकारताना प्रामाणिक प्रयत्न हवेत - महेश मांजरेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 6:44 PM

हिंदी, मराठी, तेलुगु, बंगाली आदी भाषिक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाद्वारे महेश मांजरेकर यांनी इंडस्ट्रीत आगळावेगळा ठसा उमटविला आहे. त्यांचा नुकताच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा बायोपिक रिलीज झाला असून तोही यशस्वीतेच्या मार्गावर आहे.

 

-रवींद्र मोरे 

हिंदी, मराठी, तेलुगु, बंगाली आदी भाषिक चित्रपटांत आपल्या दमदार अभिनयाद्वारे  महेश मांजरेकर यांनी इंडस्ट्रीत आगळावेगळा ठसा उमटविला आहे. मांजरेकर यांचे दिग्दर्शनही उत्कृष्ट असून त्यांचे आजपर्यंतचे सर्वच चित्रपट हिट ठरले आहेत. त्यांचा नुकताच ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा बायोपिक रिलीज झाला असून तोही यशस्वीतेच्या मार्गावर आहे. या चित्रपटाबाबत तसेच त्यांच्या आजपर्यंतच्या प्रवासाबाबत त्यांच्याशी साधलेला संवाद...

 

 ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ चित्रपटाचे वेगळेपण काय आहे?- वेगळेपणासाठी काहीही प्रयत्न करावे लागत नाही. तुम्ही प्रामाणिकपणे काम करा. काही वेगळेपण केल्याने प्रेक्षक आले असते तर सर्वांनीच वेगळे केले असते. मराठी असो वा हिंदी त्यात वेगळेपणाचा काही फॉर्म्युला नसतो. वेगळेपण करायला गेले की, लोकं फसतात. यासाठी ज्या विषयाला जशी गरज असते तसे त्याला हाताळणे गरजेचे असते. हा एक बायोपिक आहे, यासाठी प्रामाणिकपणेच काम करावे लागले. 

 ‘भाई...’ चित्रपट यशस्वी होण्यासाठी आपण काय प्रयत्न केले?- काहीही प्रयत्न केले नाहीत. प्रत्येक चित्रपट यशस्वी व्हावा यासाठी प्रामाणिक प्रयत्न करतो. तसे आपण काही वेगळे करण्याची गरज नसते. विषयानुरुप आपोआपच प्रयत्न केले जातात. तसे राहिले असते तर आतापर्यंत सर्वच सिनेमे यशस्वी झाले असते. 

 मराठी चित्रपटांना थिएटर मिळण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो का? याबाबत काय सांगाल?- तसे काही नाही. हल्ली मराठी चित्रपटांनाही चांगले स्थान मिळतेय. गेल्या आठवड्यात परिस्थिती तशी होती. ही समस्या मराठीच नव्हे तर हिंदी चित्रपटासाठीही होऊ शकते. त्या आठवड्यात ‘सिम्बा’नंतर जर एखादा हिंदी रिलीज झाला असता तर त्यालाही या समस्येचा सामना करावा लागला असता. माझा एकच म्हणणं होतं की, ज्याठिकाणी मराठी लोकं आहेत त्याठिकाणी निदान एकतरी थिएटर द्यावे. मात्र सध्या जवळपास सर्वत्र मल्टीप्लेक्स झाल्याने फार मोठी समस्या राहिली नाही.  आगामी काळात आपण कोणत्या आशयावर काम करणे पसंत कराल?- लोकांच्या आवडी बद्दल काहीच सांगू शकत नाही, मात्र सध्या लोकांना प्रामाणिकपणाने काम केलेले आवडू लागले आहे. आता वेगवेगळ्या धाटणीचे सिनेमे चालतात. त्यात बधाई हो, सिम्बासारखे सिनेमेही चालतात. आगामी काळात जसे विषय सुचतील तसे काम करेल. मात्र सध्या ‘भाई..’च्या दुसऱ्या भागावर लक्ष केंद्रित आहे.

 मराठी चित्रपटाच्या यशस्वीतेसाठी अजून नेमके कशाची आवश्यकता आहे?- काम करताना प्रामाणिक प्रयत्न केल्यास लोकांना त्याची जाणिव होते आणि लोकं ते काम पाहण्यासाठी आवर्जून येतात. आणि आता मराठी चित्रपटही यशस्वी होऊ लागले आहेत. मराठी चित्रपटातही वेगवेगळे विषय हाताळण्यात येत आहेत. यासाठी आपण सर्वांनी जाहिर करायला हवे की, हिंदी सिनेमांना आता राम राम करा. नेमके काय होते, महाराष्ट्रात हिंदी सर्वांना कळते त्यामुळे ही समस्या उद्भवते. मात्र साउथमध्ये हिंदी कळत नसल्याने तिथे कोणी बघतही नाही. त्यामुळे तिथे स्पर्धा नसते. 

 अभिनय क्षेत्रात येणाऱ्या  नवोदित कलाकारांना काय संदेश द्याल?- या क्षेत्रात जरी स्पर्धा आहे, तरी प्रामाणिक प्रयत्न आणि मेहनतीच्या जोरावर यश मिळवू शकतात. ज्यांची प्रामाणिकपणे मेहनत करण्याची तयारी असेल त्यांनी या क्षेत्रात नक्की यावे. 

टॅग्स :भाई-व्यक्ती की वल्लीमहेश मांजरेकर