Join us  

'घरा'वर आधारित हृदयस्पर्शी सिनेमा ‘होम स्वीट होम’

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2018 3:27 PM

आपल्या आयुष्यात घराचं स्थान काय असतं हे विषद करणारा  ‘होम स्वीट होम’ हा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झाला आहे

ठळक मुद्देअभिनेता हृषीकेश जोशी यांनी या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले

आपल्या आयुष्यात घराचं स्थान काय असतं हे विषद करणारा ‘होम स्वीट होम’ हा हृदयस्पर्शी मराठी चित्रपट राज्यभरात प्रदर्शित झाला आहे. दिवंगत अभिनेत्री रीमा लागू यांच्यासोबत ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची अफलातून केमिस्ट्री बघायला मिळाल्यामुळे मराठी प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे पर्वणी ठरली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने नुकतीच अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी, मोहन जोशी स्पृहा जोशी, विभावरी देशपांडे, दीप्ती लेले यांनी लोकमतच्या कार्यालयाला भेट दिली आणि चित्रपटाविषयी दिलखुलास गप्पा मारल्या.  

अभिनेता, लेखक हृषीकेश जोशी यांचा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट असूनसुद्धा ट्रेलर पाहूनच हा सिनेमा जमून आलाय असे वाटते. ते सांगतात, भावनिक गोष्ट जर विनोदी पद्धतीने सांगितली तर ती प्रेक्षकांना नक्कीच भावते. या चित्रपटात ३५ वर्षे एकाच घरात वास्तव्य केलेल्या दाम्पत्याच्या मनात घराविषयी असणारे स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. रीमा आणि मोहन जोशी यांच्यातील आंबट - गोड नाते उलगडताना अनेक प्रसंगाशी प्रेक्षक स्वतःला कनेक्ट करु शक्तील. या दाम्पत्यामधील निखळ विनोदी किस्सेदेखील प्रेक्षकांना नक्कीच आवडतील.

चित्रपटातील गाण्यांविषयी ते म्हणाले, संगीतकार नरेंद्र भिडे, संतोष मुळेकर यांनी कवी, गीतकार वैभव जोशी यांच्या गीतांना स्वरबद्ध केले आहे. गायक अजय गोगावले यांचे ‘ईकडून तिकडे’ आणि सचिन पिळगावकर यांच्या आवाजातील ‘हाय काय, नाय काय’ ही गाणी ओठांवर रुळतील अशी आहेत. 

एका मध्यमवर्गीय कुटुंबाची कथा या चित्रपटात असून स्पृहा जोशीने कुटुंबातील सर्वात धाकटी सदस्य असलेल्या देविकाची व्यक्तीरेखा साकारली आहे. ती सांगते, हॉटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेणारी देविका आजच्या पिढीतील बिनधास्त आयुष्य जगणारी तरुणी आहे. एका हातात मोबाईल, कानात हेडफोन्स, दुसऱ्या हातात कॉफीचा मग आणि कॉलेज मित्रांसोबत मज्जा, मस्ती करणारी ती अतिशय अल्लड, खट्याळ स्वभावाची मुलगी असली तरी, समजूतदार सुद्धा आहे. कॉलेजला जाणारी प्रत्येक मुलगी या देविकाशी स्वतःला कनेक्ट करू शकते. मोहन जोशी म्हणाले, घर हे फक्त चार भिंतीमुळे उभे राहत नाही, त्यासाठी लागतो कुटुंबाचा जिव्हाळा. प्रदेश, संस्कृती बदलली की घराची रचना बदलते भावना मात्र कायम असतात. घर हे काहीही न बोलता देखील घरातील सदस्यांबद्दल नकळतपणे खूप काही सांगून जाते.  कुटुंब आणि घर यांच्यातील अनोखे नाते नव्या दृष्टीकोनातून सांगणारा असा हा चित्रपट आहे. विभावारी देशपांडेने यात घरातील कामवाल्या बाईची भूमिका साकारली आहे. ती म्हणाली, भूमिका कोणती आहे यापेक्षा त्यात किती शेड्स आहेत हे मी लक्षात घेते. घराविषयी असलेला जिव्हाळा या भूमिकेतून दाखविण्याचा मी प्रयत्न केला आहे. रीमा लागूंचे पूर्वायुष्य साकारणारी दीप्ती म्हणाली की, रीमाताईंना मी जवळून ओळखत असल्याने मला त्यांचा तारुण्यकाल साकारताना अडचण आली नाही.  चित्रपटाची निर्मिती फ्रेम्स प्रॉडक्शन कंपनी प्रा. लि. यांची असून प्रोऍक्टिव्ह प्रस्तुतकर्ते आहेत. 

टॅग्स :होम स्वीट होम