आपल्या आवाजाने गायक महेश काळे यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशा या मराठी इंडस्ट्रीतील आघाडीच्या कलाकारांनी राजधानीतील ऐतिहासिक इंडिया गेटवर इतिहास घडविला. दिल्ली मराठी प्रतिष्ठानच्यावतीने इंडिया गेट येथे दिवाळी पहाटचे आयोजन करण्यात आले होते. दिवाळीच्या भल्या पहाटे आपल्या आवाजाने महेशने दिल्लीकरांच्या दिवाळीला चार चाँद लावले. त्याच्या या कार्यक्रमाला गुलाबी थंडीत ही रसिकांनी मोठया प्रमाणात गर्दी केली होती. आपल्या निवेदनाने अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने कार्यक्रमात अधिक रंग भरले होते. या कार्यक्रमाची सुरूवात महेशने अहीर भैरव रागातील स्वरचित ‘शीतल चलत पवन’ या मध्यलयीतील बंदिशीने केली. तसेच या कार्यक्रमात सूर निरागस हो, घेई छंद मकरंद ,मनमंदिरा तेजाने, अरुणी किरण गगनी चमके अशी अनेक नाट्यपदे यावेळी सादर केली. त्याचबरोबर माझे जीवनगाणे, अबीर गुलाल, गोमू माहेरला जाते हो नाखवा, निगार हो होशियार आदी गीते गाऊन पं. अभिषेकी यांनाही स्वरमय आदरांजली वाहिली. यापूर्वी महेशला कट्यार काळजात घुसली या चित्रपटाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. सोनालीने मितवा, पोस्टर गर्ल, नटरंग असे अनेक सुपरहिट चित्रपट मराठी इंडस्ट्रीला दिले. या ऐतिहासिक कार्यक्रमाविषयी लोकमत सीएनएक्सला सोनाली सांगते, आजपर्यत इंडिया गेटवर असा कोणताच कार्यक्रम झाला नाही. हा पहिलाच कार्यक्रम मराठीमध्ये राजधानीच्या गुलाबी थंडीत पार पडला. हा जो इतिहास घडला आहे, त्याचा अधिक अभिमान वाटतो आहे. दिल्लीच्या मोकळया वातावरणातील हा अनुभव माझ्यासाठी खूप छान होता. या कार्यक्रमाच्या निवेदनासाठी महेशने मला ही संधी दिली. त्यामुळे मला या ऐतिहासिक कार्यक्रमाचा साक्षीदार बनता आलं.
महेश, सोनालीने घडविला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2016 17:31 IST