प्रत्येकाने दिवाळी हा सण धुमधडाक्यात साजरा केला. प्रत्येकजण आपल्या फॅमिलीसोबत दिपोत्सवचा आनंद घेत होते. कोणी मोबाईलवरून तर कोणी प्रत्यक्षात भेटून आपले नातेवाईक, मित्र परिवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. पण प्रेक्षकांचा लाडका अभिनेता हेमंत ढोमे याने अनोख्या पध्दतीने दिवाळी साजरी केली आहे. त्याने प्रत्यक्षात पोलिस स्टेशनला भेट देवून पोलिसांसोबत दिपोत्सवचा आनंद लुटला आहे. पोलिसांसोबत दिवाळीचा आनंद लुटतानाचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर अपडेट केले आहे. या फोटोमध्ये हेमंतची पत्नी म्हणजेच अभिनेत्री क्षिती जोगदेखील दिसत आहे. त्याच्या या अनोख्या दिवाळी सेलिब्रेशनविषयी हेमंत लोकमत सीएनएक्सला सांगतो, पोलिस हे आपला परिवार, मित्र मंडळी, नातेवाईक सोडून नागरिकांच्या सेवेसाठी बारा ही महिने कामावर रूजू असतात. त्यांना कोणताही सण नसतो. गणपती असो या दिवाळी पोलिस हे नागरिकांच्या सेवेसाठी नेहमीच कार्यरत असतात. त्यामुळे ही दिवाळी पोलिसांसोबत साजरी करताना खूप आनंद झाला. ही दिवाळी आम्ही पुणे येथील चतुश्रुंगी पोलिस स्टेशनला साजरी केली आहे. माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली होती. आमच्या फॅमिलीतील आम्ही १० ते १५ जण होतो. येथील पोलिसांनी कोणतेही फटाके न फोडता दिवाळी साजरी केली. संपूर्ण पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी दिवे लावले होते. हे फोलिस स्टेशन दिव्यांनी उजळून निघाले होते. आपण ज्या ठिकाणी काम करतो. त्याठिकाणी सकारात्मक वातावरण असावे. असा त्यामागील हेतू होता. तसेच हा अनुभव माझ्याासाठी व परिवारासाठी खूपच वेगळा होता. हेमंतने यापूर्वी क्षणभर विश्रांती, जय जय महाराष्ट्र माझा, आंधळी कोशिंबिर, पोस्टर गर्ल असे अनेक चित्रपट केले आहेत. तसेच तो आता एका आगामी चित्रपटाचे देखील दिग्दर्शक करत आहे. अशा या मराठी इंडस्ट्रीच्या या जोडीने पोलिसांसोबत दिवाळी साजरी करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
हेमंतची दिवाळी पोलिसांसोबत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 13:23 IST