Join us

"स्वत:चं भविष्य अंधारात असणारे...", राहुल सोलापूरकर यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर हेमंत ढोमे संतप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 14:44 IST

मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आता हेमंत ढोमेने यावर प्रतिक्रिया देत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी औरंगजेबाच्या वजीर आणि त्याच्या पत्नीला लाच देऊन आग्र्याहून सुटले. पेटारे-बिटारे काही नव्हते. चक्क लाच देऊन ते तिथून बाहेर पडले त्यासाठी किती हुंडा वटवला याचे पुरावेही आहेत असं सांगत मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी नव्या वादाला तोंड फोडलं आहे. त्यांच्या या विधानामुळे शिवप्रेमी संतप्त झाले असून आता हेमंत ढोमेने यावर प्रतिक्रिया देत तीव्र संताप व्यक्त केला आहे. 

राहुल सोलापूरकर यांच्या या विधानानंतर मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेने ट्वीट केलं आहे.  "इतिहासाला त्याच्या जागी राहू द्या! आम्हाला आमच्या महाराजांच्या “रंजक” गोष्टींमधेच रमू द्या! रोज उठून नवा इतिहास सांगणारे स्वतःचे भविष्य अंधारात असणारे असतात! असल्या दुर्लक्षित आणि स्वतःकडे लक्ष वेधू पाहणाऱ्या स्वस्तातल्या इतिहासाचार्यांकडे सुज्ञांनी लक्ष न दिलेले बरे! उगाच सगळे सोलापूरकर बदनाम होतात! जयशिवराय", असं त्याने ट्वीटमध्ये म्हटलं आहे. 

नेमकं काय म्हणाले राहुल सोलापूरकर? 

मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब चॅनेलला मुलाखत देताना अभिनेते राहुल सोलापूरकर म्हणाले की, महाराज आग्र्याहून सुटले त्यावेळी पेटारे बिटारे काही नव्हते, चक्क लाच देऊन महाराज आलेत. त्यासाठी किती हुंडा वटवला त्याचेही पुरावे आहेत. अगदी औरंगजेबाच्या वजीराला आणि त्याच्या बायकोलाही महाराजांनी लाच दिली आहे. मोहसिन खान की मोईन खान असं नाव आहे त्याच्याकडून अधिकृत शिक्के परवाने घेऊन सगळे बाहेर पडलेत. स्वामी परमानंद ५ हत्ती घेऊन शेवटी निघाले, त्यांच्या परवान्याची खूणसुद्धा आहे. गोष्टी रुपात करताना मग ते लोकांना जरा रंजक करून सांगावे लागते. रंजकता आली इतिहासाला कुठे तरी छेद मिळतो किंवा बाजूला टाकला जातो मग खरा इतिहास लोकांपर्यंत जात नाही असं सोलापूरकरांनी दावा केला आहे.

इतकेच नाही तर गोष्टी रुपात अनेक कथा शिकवल्या जातात. महाराजांच्या शिस्तीचे मोठेपण म्हणून रचलेली स्टारी म्हणजे गडाचे दरवाजे सूर्यास्तानंतर बंद व्हायचे, याचातून निर्माण झालेली कथा हिरकणी आहे. हिरकणी घडलेलीच नाही. मी रायगडावर फिल्म केलीय हिरकणी असं काही नाही. असा इतिहासच नाही पण ते लिहिले गेले. गोष्टी रुपातला इतिहास आपण पुढे मांडायचा प्रयत्न करतो. रंजकतेच्या नावाखाली खरा इतिहास आणि खरे शिवाजी समजत नाही असं त्यांनी म्हटलं.  

टॅग्स :Hemant Dhome Today Newsछत्रपती शिवाजी महाराजमराठी अभिनेता