Join us  

 ‘पदर नीट घेतला असता तर अजुन...’;  महिलेची कमेंट वाचली अन् हेमांगी कवीची सटकली!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 5:43 PM

Hemangi Kavi : हेमांगीने स्वत:चे नऊवारी साडीतील फोटो शेअर केलेत आणि एका चाहतीने यावर अशी काही कमेंट केली की, हेमांगीची सटकली.

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी हेमांगी ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ या पोस्टमुळे चर्चेत होती. यावरून अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं. पण हेमांगी या ट्रोलर्सला पुरून उरली होती.

अभिनेत्री हेमांगी कवी (Hemangi Kavi) म्हणजे बिनधास्त रोखठोक अभिनेत्री. मुद्दा कुठलाही असो, परखड बोलणारी, आपला मुद्दा पटवून देणारी अभिनेत्री.  अनेकदा ती यावरून ट्रोलही होते. काही दिवसांपूर्वी हेमांगी ‘बाई, बूब्स आणि ब्रा’ या पोस्टमुळे चर्चेत होती. यावरून अनेकांनी तिला ट्रोलही केलं होतं. पण हेमांगी या ट्रोलर्सला पुरून उरली होती. आत्ताचं प्रकरण जरा वेगळं. हेमांगीने स्वत:चे नऊवारी साडीतील फोटो शेअर केलेत आणि एका चाहतीने यावर अशी काही कमेंट केली की, हेमांगीची सटकली. मग काय, या चाहतीला हेमांगीनं अगदी सडेतोड उत्तर दिलं.

तर त्याचं झालं असं की, हेमांगीने स्वत:चे नऊवारी साडीतील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत. तिच्या या फोटोवर शेकडो लोकांनी कमेंट्स केल्या. पण एका बाईची कमेंट हेमांगीला चांगलीच खटकली. मग काय, हेमांगीने तिला चांगलंच सुनावलं.‘खूप छान दिसतेस. साधेपणातलं तुझं सौंदर्य छानच. तुझे विचारही खूप छान आहेत. थोडंसं खटकलं- मराठमोळ्या पेहरावावर पदरही नीट घेतला असतास तर अजून छान दिसलं असतं,’ अशी कमेंट एका चाहतीने केली.

चाहतीची ही कमेंट आणि पदर नीट घेतला असता तर..., हे त्यातलं वाक्य वाचून हेमांगीची तळपायाची आग मस्तकात गेली. मग काय तिनं बाईचा चांगलाच क्लास घेतला.‘पदर नीट घेतला असता म्हणजे? हे एक बाईच कसं बोलू शकते? याचं नवल वाटतं मला! ते ही तुमच्या सारख्या स्लीव्हलेस घातलेल्या बाई कडून यावं? मराठमोळ्या संस्कृतीत साडीवर स्लीव्हलेस कधी होता जरा सांगता का? माझं अज्ञान तेवढंच दूर होईल!,’ असा सणसणीत टोला तिनं लगावला. यावर त्या बाईही गप्प बसल्या नाहीत. ‘एखादीवेळी तुझी एखादी गोष्ट आवडली नाही तर खिलाडूवृत्तीने घे’, असा सल्ला तिने हेमांगीला दिला.

हेमांगी मग आणखीच बिथरली. ‘नक्कीच, पण आपण बायका जिकडे लक्ष जाणार नाही किंवा लोकांच्या लक्षातही येणार नाही अशा गोष्टी का अधोरेखित करतो? आणि समजा लक्ष गेलंच तर तो त्यांच्या बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो. आपण कितीही झाकून ठेवलं तरी ज्याला जे बघायचंय आणि विचार करायचाय तो करतोच. लोकांनी मला छानच म्हणावं असा माझा बिलकुल हट्ट नाही. पण नको त्या गोष्टी पॉईन्ट आऊट करणं हे कितपत योग्य,’ अशा कडक शब्दांत तिनं उत्तर दिलं. हा ‘सिलसिला’ इथंच थांबला नाही, हेही सांगणे नकोच...

टॅग्स :हेमांगी कवी