Join us  

नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या भूमिकेत दिसणार मराठीतील हा प्रसिद्ध अभिनेता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2018 11:21 AM

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते... ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात ...

ज्यांच्या नावावर तिकीटबारीवर हाउसफुल्लचे बोर्ड लागत होते... ज्या नावाने मराठी रसिकांना अक्षरश: वेड लावले होते. ज्यांच्या प्रवेशानेच टाळ्यांच्या कडकडाटात नाट्यगृहे दणाणून जात होती असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉ. काशिनाथ घाणेकर रुपेरी पडद्यावर आपल्या भेटीला येणार आहेत. मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉ. काशिनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे. त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले, अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले. प्रभावशाली संवादफेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती. रायगडाला जेव्हा जाग येते, इथे ओशाळला मृत्यू, अश्रूंची झाली फुले, गारंबीचा बापू, आनंदी गोपाळ, शितू, तुझे आहे तुजपाशी, सुंदर मी होणार, मधुमंजिरी या आणि अशा अनेक नाटकांमधील त्यांच्या भूमिका जबरदस्त गाजल्या. या महान अभिनेत्याला वायकॉम18 मोशन पिक्चर्स दिवाळीच्या शुभमुहूर्तावर “आणि .... काशिनाथ घाणेकर” या  सिनेमाद्वारे रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. वायकॉम18 मोशन पिक्चर्स, द स्टुडिओ बायोपिक्सच्या उल्लेखनीय सादरीकरणासाठी प्रसिद्ध आहे आणि आता ते सज्ज आहेत मराठीतील सुपरस्टार आणि महान रंगकर्मी डॉ. काशिनाथ घाणेकर यांचा विलक्षण प्रवास रुपेरी पडद्यावर सादर करण्यासाठी ‘आणि...काशिनाथ घाणेकर’या सिनेमाद्वारे. हे जबरदस्त व्यक्तिमत्व पडद्यावर साकारत आहे सगळ्यांचा लाडका आणि अष्टपैलू अभिनेता सुबोध भावे... तसेच त्यांच्यासोबत असणार आहे सोनाली कुलकर्णी, सुमित राघवन. हा सिनेमा ७ नोव्हेंबर रोजी सर्वत्र रिलीझ होत आहे. आजचा मराठीमधला सुपरस्टार सुबोध भावे ज्याने आजवर वेगवेगळ्या भूमिकांद्वारे प्रेक्षकांचे मन जिंकले. तो आता एका वेगळ्या भूमिकेत आणि वेगळ्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.१९६० च्या दशकावर आधारित असलेल्या “आणि... काशिनाथ घाणेकर” मध्ये या अभिनेत्याचा उदय आणि अस्त दाखविण्यात येणार आहे. काशिनाथ घाणेकर यांनी मराठी रंगभूमीचा चेहेरामोहरा नाट्यमय रीत्या बदलून टाकला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन अभिजीत देशपांडे यांनी केले आहे.Also Read : ​पुन्हा एकदा 'या' मराठी सिनेमातून सुबोध भावे आणि श्रुती मराठी झळकणार एकत्र