आपल्या आयुष्यात मित्राचं नातं अनोखं असतं...त्यामुळे फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने अभिनेत्रींच्या मैत्रीच्या भावना जाणून घेऊया....
जुई गडकरी
माझ्यासाठी मैत्री म्हणजे स्वत:चं अस्तित्व टिकवून स्वत:च्या भावना व्यक्त करता येणं,ज्यामध्ये खोटेपणा आणि शंकेला जागा नसेल. आणि एकमेकांच्या विचारात स्पष्टता असणे, कोणत्याही परिस्थितीत एकमेकांच्या सोबतीला कायम आधार म्हणून उभे राहणे हे देखील मैत्रीचं एक कर्तव्य असतं.
माझे बरेच मित्र-मैत्रिणी आहेत पण मी सगळ्याकडे व्यक्त नाही होत किंवा मी सगळंच सगळ्यांशी शेअर करते असं नाही आणि इंडस्ट्रीमध्ये कोणा एका व्यक्तीवर विश्वास ठेवणे फार कठीण. माझ्या आयुष्यात मी कमावलेला माझा खरा मित्र म्हणजे प्रसाद लिमये.गेल्या ८ वर्षांपासून आमची खास मैत्री आहे आणि माझा प्रत्येक वर्षीचा 'फ्रेंडशिप डे' हा माझा जिवलग मित्र प्रसाद यासाठी असतो.
गौरी नलावडे
माझ्या मते मैत्रीचे दोन अर्थ म्हणजे जिथे मित्र आहेत तिथे कुटुंब आहे आणि दुसरे म्हणजे असेही काही मित्र आहेत जे हक्काच्या घराचा, कुटुंबाचा एक भाग बनले आहे.अशीच आपल्या इंडस्ट्रीमधील माझी हक्काची आणि लाडाची मैत्रिण म्हणजे खुशबू तावडे. खरं तर आम्ही एकमेकींचे निमो आहोत, आम्ही दोघी खोल समुद्रात कधीही हरवलो तरी आम्ही एकमेकांना नक्की शोधून काढू याची आम्हांला खात्री आहे.अशी आमची ही मैत्री. माझ्या निमोवर उर्फ खुशबूवर माझे जिवापाड प्रेम आहे आणि अर्थात तिचे पण माझ्यावर.