Join us  

फिरोदिया करंडक २०१८ विजेत्या नाटकांचे मुंबईत या तारखेला होणार प्रयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 10:38 AM

देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्याने नाट्यक्षेत्रास कायमच भरीव योगदान दिले आहे. अनेक कलाकार, लेखक, तंत्रज्ञ, दिग्दर्शक व त्याचबरोबर ...

देशाची सांस्कृतिक राजधानी म्हणवल्या जाणाऱ्या पुण्याने नाट्यक्षेत्रास कायमच भरीव योगदान दिले आहे. अनेक कलाकार, लेखक, तंत्रज्ञ, दिग्दर्शक व त्याचबरोबर उत्तमोत्तम कलाकृती पुण्याने नाट्यक्षेत्रास दिल्या आहेत. इतक्या वर्षांनंतरही सातत्याने सुरू असलेली एक गोष्ट म्हणजे प्रयोगशीलता. पुण्यातील मानाच्या फिरोदिया करंडक या आंतरमहाविद्यालयीन विविधगुणदर्शन स्पर्धेतून नव्या कलावंतांना आणि विद्यार्थ्यांना असेच व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाते. लाईव्ह म्युझिक, नृत्य, नाट्य, अभिनय, चित्रकला, शिल्पकला व आणखीही अनेक कलांची सुरेख गुंफण असलेला नाट्याविष्कार म्हणजे फिरोदियाच्या स्पर्धेतील नाटक होय.यामध्ये कोणत्याही रेकॉर्डेड संगीताचा वापर केला जात नाही.संपूर्णपणे लाईव्ह म्युझिक, नृत्य यांमुळे प्रयोगात वेगळीच जान येते. शिवाय नाटकातील कथेच्या  भोवती या सगळ्याची गुंफण असल्यामुळे कथाही आणखी जिवंत होते, हे वेगळे सांगण्याची गरज नाही यंदाच्या फिरोदिया करंडक स्पर्धेतील पहिले दोन विजेते असलेले 'इतिहास गवा है?' हे बीएमसीसीचे नाटक व स. प. महाविद्यालयाचे 'सररीयल' ही दोन अप्रतिम नाटक पाहण्याची संधी मुंबईकरांना मिळणार आहे.अशा या अप्रतिम नाटकांचा मुंबईत प्रयोग करण्याची तीन वर्षांनंतर ही दुसरीच वेळ आहे.“वाईड विंग्ज मीडिया” व “सुबक” या “सुनील बर्वे” यांच्या संस्थेतर्फे एकत्रितपणे या प्रयोगांचे आयोजन करण्यात आले आहे.“स्वप्नभूमी”, पुणे व “जाई काजळ” या संस्थांचेही त्यास सहकार्य आहे. दिनांक ५ मे २०१८ रोजी माटुंगा,मुंबईयेथील “यशवंतराव नाट्य मंदिर” येथे सायंकाळी ४ वाजता या प्रयोगांचे सादरीकरण होईल. यंदाच्या फिरोदिया करंडक विजेत्या 'इतिहास गवाह है?' या नाटकात ऐतिहासिक विषयास मिश्किलपणे हात घालण्यात आला आहेय या नाटकाबाबत बोलताना दिग्दर्शक ऋषी मनोहर म्हणाला, 'प्रयोगनंतर कोणीही आमचे कौतुक करत असेल तर आमचा विषय त्यांच्यापर्यंत पोहोचला आहे, असे आम्ही मानतो. नृत्य, संगीत, विविध कला यांचे कॉम्बिनेशन असेलेले हे नाटक मनोरंजनात्मक आहे. त्याचबरोबर यात सध्या समाजात सुरू असलेल्या समस्यांवरही भाष्य करण्यात आले असून अनेक अंडरकरंट्स त्यात आहेत.' इतिहासात फारसे महत्त्व न मिळालेल्या अविराज या हिंदू राजाविषयी फिल्म लिहित असलेल्या एका लेखकाची ही कथा आहे. निर्माता देखील अविराजाची फिल्म बनविण्यास तयार होतो. इतिहासातील संदर्भांनुसार हिंदू राजा अविराजने मुघल बादशहा इब्राहिम उल हक मुस्तफा याचा वध करून हिंदू सत्ता स्थापन केली. पण, लेखनाच्या प्रक्रियेदरम्यान लेखक त्या काळात जाऊन पोहोचतो व त्याने वाचलेला इतिहास संपूर्णतः खरा नसल्याचे त्याला जाणवते. त्यानंतर त्याने लिहिलेल्या इब्राहिम व अविराजच्या पात्रांबाबत त्याच्या मनात शंका निर्माण होते. मग तो संहिता बदलतो कि इतिहासावर विश्वास ठेवतो?हे जाणून घेण्यासाठी नाटक पाहायला हवे. 'इतिहास गवाह है' हे नाटक इतिहासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करते.सर परशुराम महाविद्याच्या 'सररीयल' या नाटकाबाबत बोलताना ऋत्विक व्यास म्हणाला, 'जगात रोजच्या घडणाऱ्या घटना पाहूनच आम्हाला कथा सुचली.स्वार्थासाठीचा खोटेपणा लोक दाखवतात ज्यावर आपण विश्वास ठेवतो.या सगळ्यावर भाष्य करण्यासाठीच आम्ही हे नाटक लिहायचं ठरवलं. "माया"नावाच्या  पायाने अपंग असणाऱ्या पण अत्यंत गोंडस दिसणाऱ्या मुलीला लहानपणापासून तिच्या वडिलांनी तिला सांभाळलेलं असतं. त्यांचं नाव 'गुरू'. आपल्या फिजिकली चॅलेंज मुलीला गुरू अत्यंत कष्टाने वाढवत असतो. मायाचं सौंदर्य आणि तिच्यासाठी गुरुचं झटणं त्यांना या जगात खूप लोकप्रिय बनवतं. अख्या जगातून त्यांना सहानुभूती मिळायला लागते. अशा प्रसिद्ध बापलेकीच्या जोडीला "Hat's off India" नावाच्या रिअॅलिटी शोमध्ये बोलावलं जातं. इथे त्यांची भेट होते 'विक्रांत' नावाच्या सुप्रसिद्ध कलाकारांमुळेचे  नाटकाला वेगळे वळण मिळते. आत्तापर्यंत कधीच न अनुभवलेल्या मायावी जगातून गुरू, माया, व प्रेक्षकही प्रवास करायला लागतो. आणि या सफरीतून पात्रांची खरी रूपं दिसायला लागतात.स्वार्थ आणि मोह यामुळे पडद्यामागे राहिलेलं सत्य जगासमोर यायला लागतं. नाटकाचा नायक कोण आणि खलनायक कोण हा मोठा प्रश्न उभा राहतो.अखेर एका विदारक वास्तवापाशी येऊन नाटक थांबतं.