Join us  

एका रात्रीत केलेल्या 'त्या' बदलामुळे 'एका लग्नाची गोष्ट' झालं हिट; प्रशांत दामलेंनी सांगितला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 03, 2023 4:06 PM

Prashant damle: प्रेक्षकांमधून एक प्रतिक्रिया आली ज्यानंतर हे नाटक फसलंय याची जाणीव प्रशांत दामले यांना झाली.

प्रशांत दामले आणि कविता लाड-मेढेकर यांची एका लग्नाची गोष्ट हे नाटक तुफान गाजलेल्या नाटकांपैकी एक आहे. या नाटकाचे जवळपास सतराशे ते आठराशे प्रयोग झाले. विशेष म्हणजे या नाटकाचा प्रत्येक प्रयोग सुपरहिट झाला. परंतु, एकदा हे नाटक सुरु असताना मोठा किस्सा घडला होता. ज्यामुळे एका रात्रीत या नाटकाच्या रचनेत बदल करण्यात आला आणि ते सुपरहिट झालं.

अलिकडेच प्रशांत दामले यांनी मित्र म्हणे या पॉडकास्टला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्यांनी एका लग्नाची गोष्ट या नाटकाविषयी अनेक खुलासे केले. यामध्येच या नाटकाच्या अठराव्या प्रयोगामध्ये प्रेक्षकांमधून एक प्रतिक्रिया आली ज्यानंतर या नाटकाची सगळी रचना बदलण्यात आली. 

"1998 मध्ये एका लग्नाची गोष्ट या नाटकाचा एक किस्सा आहे. या नाटकाचे सतराशे-आठराशे प्रयोग झाले होते. त्यात गडकरी रंगायतनला 18 वा प्रयोग झाला होता. या प्रयोगादरम्यान सुनील तावडेचं एका वाक्य होतं 'हे असं असं झालं आहे तर पुढे करायचं काय?'  त्याने हे वाक्य म्हटल्यावर प्रेक्षकांमधून, म्हणजे बाल्कनीमधून आवाज आला 'पडदा टाका'.  हे वाक्य ऐकल्यावर,असं वाटलं झालं पडलं हे नाटक. मी लगेच मंगेशला सांगितलं काहीही करुन आजच हे नाटक दुरुस्त करावं लागेल. मग मी श्रीरंग गोडबोले यांना फोन केला. मग त्याच रात्री बसून आम्ही विचार केला तेव्हा कळलं की नाटकाचा फ्लो तुटतोय", असं प्रशांत दामले म्हणाले.

'सुधीर भटांमुळे माझं घर झालं'; प्रशांत दामलेंनी सांगितली घराची गोष्ट

पुढे ते म्हणतात,  "आमची चूक लक्षात आल्यावर आम्ही ते नाटक त्याच रात्रीत पुन्हा नव्याने लिहून काढलं. त्यानंतर १९ तारखेला जो प्रयोग झाला तो सुपरहिट झाला. त्यानंतर ते नाटक आठराशे प्रयोगांपर्यंत पोहोचलं. त्यातले ८३० प्रयोग कविताने केले आणि पुढचे प्रयोग सुजाता जोशी हिने केले." 

टॅग्स :नाटकप्रशांत दामलेकविता लाडमराठी अभिनेता