Join us

​इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. या मराठी चित्रपटांची कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवासाठी झाली निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2018 12:38 IST

कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव ८ मे ते १८ मेच्या दरम्यान होणार असून या सिनेमहोत्सवामध्ये काही मराठी चित्रपट देखील रसिकांना पाहाता ...

कान्स आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सव ८ मे ते १८ मेच्या दरम्यान होणार असून या सिनेमहोत्सवामध्ये काही मराठी चित्रपट देखील रसिकांना पाहाता येणार आहेत. कान्स सिनेमहोत्सवात राज्य शासनाकडून पाठवण्यात येणाऱ्या तीन सिनेमांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. या तीन सिनेमांमध्ये इडक, क्षितीज आणि पळशीची पी.टी. या तीन चित्रपटांचा समावेश आहे. या सिनेमहोत्सवासाठी एकून २६ चित्रपटांचे परीक्षण करण्यात आले होते. या २६ चित्रपटांमधून या तीन चित्रपटांची निवड करण्यात आली. परीक्षण समितीमध्ये दिग्दर्शक - निर्माते रघुवीर कुलकर्णी, चित्रपट समीक्षक रेखा देशपांडे, पटकथाकार, दिग्दर्शक, निर्माते अरुणा जोगळेकर, लेखक - अभिनेते प्रमोद पवार, दिग्दर्शक - निर्माते पुरुषोत्तम लेले यांचा समावेश होता.इडक या चित्रपटाचे लेखन दिपक भावे आणि दीपक गावडे यांनी केले असून या चित्रपटाची ‘इफ्फी’मध्ये देखील निवड झाली आहे. दीपक गावडे या चित्रपटाचे दिग्दर्शक असून या चित्रपटात किशोर कदम, उषा नाईक, संदीप पाठक यांच्या मुख्य भूमिका आहेत. तर पळशीची पीटी या चित्रपटाची निर्मिती फलटणमधील धोडींबा कारंडे या युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून केली आहे. या चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ हे फलटण आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातीलच आहेत. ग्रामपंचायतीत शिपाई म्हणून काम केलेल्या धोंडी ते दिग्दर्शक धोंडिबा होण्याचा हा प्रवास खडतर आाणि संघर्षाचा राहिला. साताऱ्यातील आपल्या ओळखीच्या कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींसमोर धोंडीबा कारंडेनी पळशीची पीटी या चित्रपटाचा विषय ठेवला होता. आपल्या देशात क्रिडा क्षेत्राकडे गांभीर्याने पाहण्याची मानसिकता नाही याला शासकीय धोरण जेवढे जबाबदार आहे, तेवढेच आपणही आहोत. ग्रामीण भागात तर कोणत्याच खेळाला प्रोत्साहन मिळत नाही. त्यामुळे योग्य मार्गदर्शन न मिळाल्याने अनेक खेळाडूंना हार पत्करावी लागते. खेळांबद्दल प्रेम असणाऱ्या खेळाडूंची व्यथा या चित्रपटात मांडण्यात आली आहे. तर मीडिया फिल्म्स क्राफ्ट कंपनी (यू.एस) आणि नवरोज प्रॉडक्शन निर्मित तसेच करिष्मा म्हाडोलकर सहनिर्मित 'क्षितिज... अ होरीझॉन'  या चित्रपटात उपेंद्र लिमये, मनोज जोशी यांच्या मुख्य भूमिका आहेत. Also Read : आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये 'क्षितीज' भरारी